
ते म्हणाले, ऑलिंपिक आयोजनासाठी कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. त्यावर मोठा कर्च करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी गोव्याला या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. गोव्याने जी तयारी केली ती कौतूकास्पद आहे.
येथील इन्फ्रास्ट्रक्चर अनेक दशके गोव्याला उपयोगी ठरेल. अनेक नवे खेळाडू गोव्याला मिळतील. अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोव्याला ते उपयोगी ठरेल. नॅशनल गेम्समुळे गोव्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला लाभ होईल.
गोवा सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदा, मिटिंग्जसाठी गोव्याला प्रमोट करत आहोत. जी २०, ब्रिक्स सारख्या संघटनांच्या बैठका आम्ही गोव्यात घेत आहोत. हे गोव्यासाठी अभिमानास्पद आहेच पण पर्यटनासाठीही महत्वाचे आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, जुनी यंत्रणा असती तर नव्या खेळाडूंना कधीच ओळख मिळाली नसती. क्रीडा क्षेत्राची प्रगती अर्थव्यवस्थेशी संबंधित असते. देशात नकारात्मकता असेल तर जीवनाच्या विविध क्षेत्रात त्याचा वाईट परिणाम होत असतो. देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. नवीन विक्रम नोंदवत आहे. देशाच्या स्पीडशी स्पर्धा करणे अवघड आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्याची हवाच काही और आहे. क्रीडा प्रेमी गोव्यात राष्ट्रीय स्पर्धा होणे हे उर्जादायी आहे. गोव्याने देशाला अनेक खेळाडू दिले. भारताचे क्रीडा क्षेत्र यशाची सतत उंची गाठत असताना ही स्पर्धा गोव्यात होत आहे.

गोव्यातले फूटबॉलचे वेड सर्वांनाच माहिती आहे. येथे गल्लोगल्ली फुटबॉल खेळला जातो. २०१४ नंतर आम्ही राष्ट्रीय संकल्प केला. त्यातून क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर बदलले. निवडप्रक्रिया आणखी पारदर्शी केली.
खेळाडुंना आर्थिक मदत देणाऱ्या योजनांत बदल केला. प्रशिक्षण देणाऱ्या योजनांमध्ये, जुने विचार, जुनी मानसिकता हे सर्व आम्ही बदलले. जे अडथळे होते ते आम्ही एक एक करून दूर हटवले. सरकारने टॅलेंट सर्चपासून ते खेळाडूंच्या रँक होल्डिंगपर्यंत आणि त्यांना ऑलिंपिकच्या पोडियमपर्यंत पोहचविण्याचा रोडमॅप बनवला.
पूर्वीचे सरकार क्रीडा बजेटबाबत उदासीन होते. आम्ही स्पोर्ट्सचे बजेट वाढवले. या वर्षीचे केंद्रीय स्पोर्ट्सचे बजेट नऊ वर्षांपुर्वीच्या क्रीडा बजेटच्या तुलनेत ९ पट अधिक आहे. खेलो इंडिया सारखी योजना आम्ही आणली. क्रीडापटू घडण्यासाठी एक नवी इकोसिस्टिम आम्ही बनवली.
शाळेपासून खेळाडूंमधील टॅलेंट शोधले जात आहे. सरकार क्रीडा टॅलेंटवर पैसा खर्च करत आहे. टॅलेंटेड ऑलिंपिक पोडियम (टॉप्स) या योजनेतून क्रीडापटूंवर लक्ष दिले जात आहे. खेलो इंडियामध्ये तीन हजारहून अधिक खेळाडूंचे प्रशिक्षण सुरू आहे.
गोव्याची विंड सर्फर कात्या कोएल्हो आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून खेळाडू हरमनप्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार. गोव्याचे स्वप्न पूर्ण झाले. गोव्याला क्रीडा परंपरा लाभली आहे.
ब्रह्मानंद शंखवाळकर, भक्ती कुलकर्णी यांनी अर्जून पुरस्कार मिळाला आहे. कात्या कोएल्हो सारखे खेळाडू गोव्याचे नाव क्रीडा क्षेत्रात पुढे नेत आहे. स्पोर्ट्स हब अशी गोव्याची नवी ओळख साकार करू. स्पोर्ट्सबाबतचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या.. क्या हार मे क्या जीत मे किंचीत नही भयभीत मै… कर्तव्य पथ पर जो मिला, ये भी सही है वह भी सही… या ओळी सादर केल्या.
जुडेगा, जितेगा, जितेंगे. भारत माता की जय! वंदे मातरम! मोदीजी आप आगे बढो! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सांगता केली.
गोव्यातील मल्लखांबाचे खेळाडू आणि कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त ३७ ढोलवादक यात सहभागी झाले होते.
दरम्यान, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष, माजी धावपटू आणि राज्यसभेच्या खासदार पी. टी. उषा यांनी प्रास्ताविक केले.