ट्विटरचे संचालक मंडळच केले बरखास्त
मागील आठवडय़ात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळच बरखास्त केले असून, आता संपूर्ण संचालक मंडळाची जबाबदारी ते एकटेच सांभाळणार आहेत.
या अगोदर मस्क यांनी कंपनीची मालकी मिळताच मागील आठवड्यातच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आदी अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त केल्याचे समोर आले आहे.
मस्क यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील अपेक्षित मनुष्यबळ कपातीचा भाग म्हणून एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली जात आहे, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांचा हवाला देऊन काल (सोमवार) दिले आहे.
नियामकांकडे सादर केलेल्या विवरणानुसार २०२१ अखेरीस ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या ७,००० पेक्षा जास्त होती. यापैकी एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे जवळपास २,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी शक्यता आहे. मस्क यांनी या आधी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबतच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तथापि, ताज्या घडामोडींवर ट्विटरकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.