चंद्रानंतर आता ‘इस्रो’ची आज सूर्याकडे ‘झेप’…
चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्था ( इस्रो ) आता सूर्याकडे झेप घेत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य एल१’ अंतरयान श्रीहरिकोटा येथून आज ( २ सप्टेंबर ) ११ वाजता प्रक्षेपित होत आहे. लाँचिंगच्या १२७ दिवसांनी यान एल-१ अचूक कक्षेपर्यंत पोहचेल. यानंतर सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.
‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल१’ची रचना करण्यात आली आहे.
पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल संतुलित राहतील, असे पाच बिंदू (लॅग्रॅन्जिअन पॉइंट) आहेत. त्या बिंदूंवरून सूर्याचा अभ्यास करणे विशेष व महत्त्वाचे असते. त्यातील ‘एल १’ या बिंदूचा वापर ‘आदित्य एल १’ या मोहिमेत केला जाणार आहे. सूर्यामुळे उद्रेकाच्या अनेक घटना घडतात. तो सौर मंडळामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतो. अशा प्रकारच्या स्फोटक सौर घटना घडल्या तर पृथ्वीजवळच्या अवकाशात विविध प्रकारचे परिणाम संभवतात, असे संशोधकांचे मत आहे.
सूर्याच्या अभ्यासासाठीच्या मोहिमेची घोषणा इस्रोने २००८ मध्ये केली. आतापर्यंत नासा, युरोपियन स्पेस एजन्सी अशा मोजक्या देशांतील संशोधन संस्थांनी अंतराळातील सौर मोहिमा केल्या आहेत.
दरम्यान, सूर्याच्या बाह्य भाग फोटोस्फिअर येथील तापमान ५५०० अंश सेल्सिअस असतं. तर, सूर्याच्या केंद्रबिंदूचे तापमान १.५० कोटी अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे कोणतंही यान सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही.