महाराष्ट्रसातारा
दुध भेसळखोरांना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे अभय ?
सातारा (महेश पवार) :
दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील दूध भेसळ थांबविण्यासाठी दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देऊन संपूर्ण राज्यात धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दिले .
दरम्यान ही कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाला बरोबर घेऊन कारवाई करण्याचे आदेश असताना देखील सातारा येथील कारवाईसाठी जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांनी स्वतः कार्यालयात जाऊन अन्न निरीक्षक यांना कारवाई साठी सोबत येण्यासाठी विनंती करून देखील दूध भेसळीच्या एकत्रित कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अन्ननिरीक्षक यांनी सहायक आयुक्ता भोईटे रजेवर असून पेपर स्लिप उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत कारवाईस येण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.
वास्तविक संबंधित कारवाईत पेपर स्लीप उपलब्ध नसतानाही डेअरी ची तपासणी करणे शक्य होते शिवाय नमुने देखील सर्वेक्षणासाठी घेणे शक्य होते असे असताना देखील दुग्ध विकास अधिकारी यांनी 21 ऑगस्ट रोजी कार्यालयात जाऊन कारवाईसाठी येण्याची विनंती करून देखील अन्न निरीक्षक यांनी येण्यास टाळाटाळ केली असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
अन्न औषध प्रशासनचे अधिकारी यांना डेअरी युनिटची तपासणी करणे आणि अन्न नमुना घेण्याचे डेअरी वर कारवाई करण्याचे एवढे महत्त्वाचे अधिकार प्राप्त आहेत जे की अन्य विभागांना प्राप्त नाहीत अशा परिस्थितीत या विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी जाण्यास नकार देणे आणि थातुर मातुर कारणे देऊन टाळाटाळ करणे ही बाब संशयास्पद असून यातून अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दूध भेसळखोरांना मदत करत असल्याचे प्रतित होते. अन्न निरीक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये या प्रकारे प्रभावी कामकाज होऊ शकते काय? शासनाच्या संयुक्तिक कारवाई घेण्याच्या शासन आदेशाला हरताळ अन्न निरीक्षकांनी हरताळ फासला आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या अन्न निरीक्षक यांच्या मनमानी कारभाराला चाप लावून अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार का? असेही नागरिक विचारत आहेत.