‘युवा लेखकांना मिळावे प्रोत्साहन’
कऱ्हाड (प्रतिनिधी) :
वाचक अन् लेखकांची संख्या वाढण्यासाठी युवा लेखक तयार होण्यासाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे, असे मत माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
येथील अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा व वुई हेट बायोलॉजिकल वॉर या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘दै. सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर अध्यक्षस्थानी होते. निमसोडचे माजी सरपंच मोहन देशमुख, विठ्ठलराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, “ज्या वयामध्ये पत्रकारिता करतो. त्या वयात कादंबरी लिहिणे ही कौतुकास्पद बाब आहे. आज वुई हेट बायोलॉजिकल वॉर व मसनवाटा अशा दोन कादंबऱ्या प्रकाशित करत आहोत. त्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये पिढी बदलतानाचा प्रवास लिहिला आहे. अलीकडच्या लेखक व वाचकांची संख्या घटत असलेल्या स्थितीत देशमुख यांनी चोखाळलेली वेगळी वाट कौतुकास्पद आहे. नव्या लेखकांनी तयार व्हावे, नव्या वाटा धुंडाळाव्यात त्याशिवाय इतिहास कळणार नाही. अनेक पत्रकार त्यांच्या व्यवसायात आलेले अनुभव लिहितात. मात्र, अभयने सामाजिक भान असलेले लिखाण केले. ते कौतुकास्पद आहे.”
सोळसकर म्हणाले, “कोरोनाचा कालावधी सर्वांसाठी अवघड व कठीण कालावधी होता. या काळात आपण अनेक जवळची माणसे गमावली. ज्यांच्यावर स्वतःसह कुटुंबांची महत्त्वाची जबाबदारी होती. त्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याला सावरले. त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. कोरोना काळात जबाबदारी लक्षात ठेऊन त्यांनी काम केले. वास्तविक तज्ज्ञांनाही मान्य आहे, की कोरोना चीनने जाणीवपूर्वक पसरवला. महासत्ता होण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला लक्ष करत त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा डाव आखला होता. मात्र, जगभरात कोरोनाने फार बदल घडवले. कोरोनानंतर व पूर्व अशी जगात ओळख झाली. त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. अशा संवेदनशील विषयांना हात घातला तो कौतुकास्पद आहे.” अभयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संतोष गिरी व सौ. विभूते यांनी सूत्रसंचालन केले.