…आणि जांभळे घर वस्तीचा रस्ता गेला चोरीला
सातारा (महेश पवार) :
रोहोट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या जांभळे घर वस्ती ते घाटाई यादरम्यानचा अडीच किलोमीटर चा रस्ता ठेकेदाराने डांबरीकरण आणि खडीकरण न करताच त्याचे परस्पर अकरा लाख रुपयांचे बिल काढल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे इंजिनिअर आणि ठेकेदार यांच्या संगनमता मुळे रस्ता चोरीला गेला असून यासंबंधी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व अभियंते निलंबित करावेत अन्यथा येत्या आठ दिवसानंतर सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या आवारात संसार उपयोगी साहित्यांसह ठिय्या देतील असा इशारा मोहिते यांनी दिला आहे.
या प्रकरणाची येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मोहिते म्हणाले 2018 ते 2020 या काळामध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या काळात रोहोट तालुका सातारा या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जांभळेघर वस्ती ते घाटाई या दरम्यानच्या अडीच किलोमीटरच्या रस्त्याला तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांच्या फंडातून सात लाख रुपये आणि अन्य एका योजनेअंतर्गत चार असे अकरा लाख रुपये मंजूर झाले होते या कामाचा ठेका नितीन निकम यांना देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात त्यांनी डांबरीकरण आणि खडीकरणाचे कोणतेही काम केले नाही ज्यावेळी गावातील एका स्थानिक ग्रामस्थांचे नातेवाईक सर्पदंशाने मयत झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केला असता त्यांनी कटिंग मध्ये पैसे खर्च झाल्याचे थातूरमातूर उत्तर दिले संबंधित ठेकेदाराने केवळ गावाच्या रस्त्यावर पोकलेन मशीन आणून उभे केले ते मशीन पंधरा दिवस बंद होते केवळ सात दिवस या मशीनने माती उचलून रस्त्यावर टाकून सपाटीकरण करणे एवढेच काम केले . हे काम केवळ एक लाख रुपयांचे असताना ठेकेदाराला काम न करताच या कामाचे अकरा लाख रुपये बिल देण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा मोहिते यांनी केला .
ते पुढे म्हणाले प्रत्यक्षात ग्रामस्थांनीच हा रस्ता तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत केला आहे या रस्त्यावरून जांभळेघर वस्तीपासून थेट बैलगाडी घाटाईपर्यंत आणण्याची सोय निर्माण झाली होती मात्र ठेकेदाराने काहीच काम न केल्याने ग्रामस्थांना रस्ताच उपलब्ध झालेला नाही त्यामुळे हा रस्ता शासकीय संगणमताने चोरीला गेलेला आहे असा आरोप मोहिते यांनी केला येत्या आठ दिवसांमध्ये जर ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर येथील सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या आवारात आपल्या संसार उपयोगी साहित्यासह ठिय्या आंदोलन करतील असा इशारा मोहिते यांनी दिला संबंधित कार्यकारी अभियंता उपअभियंता यांना तात्काळ निलंबित करावे आणि ठेकेदाराला टाकावे अशी मोहिते यांनी मागणी केली यावेळी शिवसेनेच्या तालुका प्रमुख स्वाती शेडगे, शहर संघटक प्रणव सावंत, आनंद कोकरे , अजय सावंत, प्रदीप सुतार, किरण कोकरे इ यावेळी उपस्थित होते .