अफजल खान कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडली
महाबळेश्वर (महेश पवार)
प्रतापगडावर असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे हटवण्याचे काम आज पहाटेपासून सुरू करण्यात आले असून, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त प्रतापगडावर तैनात करण्यात आला आहे.
प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलने ही झाले. न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे या कबड्डीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.
१० नोव्हेंबर १६५९ या तारखेप्रमाणे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. आज या ऐतिहासिक घटनेला ३६३ वर्षे पूर्ण होत असतानाच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आज प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखान याच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यास सुरवात केली आहे.
यासाठी या परिसरात १४४ कलम लागू केले असून कोणालाही तेथे जाण्यास परवानगी दिली जात नाही. ही कारवाई चोख पोलिस बंदोबस्तात सु्रू असून त्यासाठी चार जिल्ह्यातील दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. यासंदर्भात काल रात्री जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, अशा प्रकारे कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.