‘राजकीय हेवेदावे विसरुन भागाच्या विकासासाठी एकत्र या’
महाबळेश्वर (महेश पवार) :
भागाच्या विकासासाठी राजकीय हेवेदावे विसरुन सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वर येथे आयोजित मोफत आरोग्य शिबीर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, डॉ. श्रीकांत शिंदे वैद्यकीय फौंडेशन व सेवासदन लाईफ लाईन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर पंचायत समितीच्या इमारतीत सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन पुरुषोत्तम जाधव, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पुरुषोत्तम जाधव म्हणाले, दरे गावचे सुपुत्र एकनाथराव शिंदे हे आपल्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेत आहेत. आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र यावे. आरोग्य शिबिराचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले. डी. एम. बावळेकर यांनीही या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील, सतीश ओंबळे, संजय ओंबळे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना खाऊसह शालेय वस्तुंचे वाटप
दरम्यान, महाबळेश्वर नगरपालिका शाळा क्रमांक 9 मध्ये पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शाळा उपयोगी विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाबरोबरच वेण्णा लेक, महाड नाका व तापोळा फाटा परिसरात बाळासाहेबांची शिवसेना शाखा फलकांचे अनावरण पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.