‘कास पठारावरील इलेक्ट्रिक बसमुळे भांबवलीतील पर्यटन धोक्यात’
पर्यटन विभाग कास पुष्प पठारावर जाण्यासाठी इलेक्ट्रिक बसची सोय करणार आहे. तसेच कास पठाराच्या पुढे पर्यटकांच्या गाडया सोडणार नाही असे कळते. देशातला एक नंबरचा भांबवली वजराई धबधबा पहायला येणा-या पर्यटकांची संख्या मोठी आहे. भांबवलीला जायचे तर कासवरूनच जावे लागते. विशेष म्हणजे कास पुष्प पठाराला भेट देणारा पर्यटक भांबवली धबधब्याला भेट देतो. एकाच दिवशी कास व भांबवली हि दोन पर्यटनस्थळे पहाता येतात व त्यादृष्टीने पर्यटक नियोजन करून येतात, मात्र कास पठारावरील इलेक्ट्रिक बसमुळे भांबवली येथील पर्यटन धोक्यात येणार असल्याची भीती येथील पर्यटन प्रमुख रविंद्र मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
त्यांच्या पत्रकानुसार, कास पठारावर गाडयांची पार्किंग नसते. पठाराच्या खाली गाडयांचे पार्किंग आहे. मग पठारावर प्रदुषण कसे होणार, कास पठारावर गाडयांचे प्रदुषण हे निव्वळ थोतांड आहे. खरं कारण वेगळेच असु शकते, इलेक्ट्रिक बस खरेदी करायच्या व त्यात मलिदा खायचा असे खाजगीत बोलले जाते.
इलेक्ट्रिक बसचे होणारे तोटे:
१. पर्यटकांविना कासच्या आजुबाजुची पर्यटन स्थळे होस पडणार आहेय उदा. भांबवली वजराई धबधबा, बामणोली बोटिंग इ.
२. पर्यटनावर चालणारे उद्योग संपणार. स्थानिकांच्या उदरर्निवाहाचा प्रश्न उभा राहिल.
३. कास पठारावरील कुंपन काढले तर पर्यटक फुले तुडवतील, नाचतील, फुले तोडतील. याचा कोण विचार करणार.
४. आजारापेक्षा उपायच जीवघेणे. कासला प्रदुषण नाही पण प्रशासनाला ते दिसत आहे. सातारा शहरात गाडयाच गाड्या तेथे प्रदुषण आहे, प्रथम तिथे इलेक्ट्रिक गाडया चालु केल्या पाहिजेत.
जुनचा पाऊस जुलैवर गेल्यामुळे भांबवली वजराई धबधबा एक महिना उशीरा चालु झाला. दरड पडल्याने काही दिवस रस्ता बंद होता. धुंवाधार पावसामुळे कास पुलावरून पाणी वाहत होते, त्यामुळे काही दिवस रस्ता बंद. भांबवली धबधबा पर्यटन हंगाम एक महिना उशीरा चालु झाला, पावसामुळे एक महिना रस्ता बंद म्हणजे फक्त एक महिनाच हंगामासाठी मिळाला. भांबवलीतील स्थानिक कासच्या फुलांच्या हंगामाकडे लक्ष लावुन होते. कासची फुले पहायला येणारे पर्यटक हमखास भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात. कासच्या पुढे पर्यटकांच्या गाडया जावु दिल्या जाणार नाहीत या बातमीने स्थानिक भांबवलीवाल्यांच्या मनात धडकी भरली आहे. पर्यटन हेच एक उदरर्निवाहचे साधन बाकी आहे. वन्यप्राण्यांमुळे शेती बुडाली. स्थानीकांना प्रश्न पडला आहे कि जगायचं कसं. प्रशासन रोज नवनवे निर्णय घेते. हे अधिकारी एसी केबीनमध्ये बसुन निर्णय घेतात. एसी कारने प्रवास करतात. त्यांना स्थानिकांना होणार त्रास कसा कळणार.
इलेक्ट्रिक बसमुळे भांबवली धबधबा पर्यटनावर होणारा दुष्परिणाम याचा जिल्हाधिकारी यांनी विचार करून इलेक्ट्रिक बसचा पर्याय रद्द करावा अशी संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली यांची विनंती आहे.