सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर..?
सातारा (महेश पवार) :
कण्हेरखेडचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर शिंदे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. किशोर शिंदे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आजवर विविध शासकीय कार्यालय, बँक प्रशासन यांच्याशी केलेल्या पाठपुराव्याचे साक्षीदार राष्ट्रमत आहे. शिंदे यांनी वरील विषयाच्या आधारे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, केंद्रीय तपास यंत्रणा यांना पुराव्यासह केलेल्या अनेक तक्रारीनंतर सातारा जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी Enforcement Directorate (ED) ने सहकार आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हा उपनिबंधक यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. सातारा जिल्हा उपनिबंधक यांना विचारलेल्या प्रशांची उत्तरे व त्याबद्दलचा तपशीलवार खुलासा अजूनही सातारा जिल्हयासाठी गुपित बनून राहिलाय. सदर विषयावरील योग्य खुलाश्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भूकंप येणार आहे याची तक्रारदार यांना खात्री आहे.
जरंडेश्वर सहकारी कारखाना प्रकरणात ईडिला खुलासा करणारी जिल्हा बँक सामाजिक आणी माहिती अधिकारी कार्यकर्ते किशोर शिंदे यांच्या दुबार पीककर्ज घोटाळा प्रकरणावर गप्प असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
गोरगरीब शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे भरमसाठ टक्केवारी लादून गब्बर झालेल्या संस्थेचा खरा चेहरा आता समोर येण्यासाठी निर्भेडपणे प्रश्न विचारत शेतकऱ्यांना जागं केलं पाहिजे, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. वास्तविक शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था, त्यांचे हक्क, ही जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अंधश्रद्धा म्हणावी लागेल कारण त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय अनुदानित योजना पद्धशीरपणे डावलत स्वतःला, स्वतःच्या चमचे, कौटुंबिक व व्यवसायिक हितेशी, संस्था, संघटना यांच्या घशात घालणाऱ्या सर्व पक्षीय टोळीला जाब विचारणार कोण? असाही सवाल शिंदे यांनी विचारला आहे.
शेतकरी ह्या दुर्बल घटकांकडून सक्तीची 100% वसुली ही अवास्तवादी, अघोरीं अशा छुप्या सहकारी सावकारीतून घडवून आणली जातेय. हा सर्व नियोजित कट उघड करण्यासाठी किशोर शिंदे यांनी माध्यमाना, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, शेतकरी संगठना इत्यादी यांना आवाहन केले आहे. आता तरी प्रश्न विचारत बोलके व्हा, आणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या संघटित सहकारी गुन्हेगारी करणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय अलीबाबा चाळीस चोरांच्या तावडीतून मुक्त करत आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.