‘कराड रत्नागिरी राज्य मार्गावर धर्माप्लास्टचे पट्टे व गतिरोधक करा’
कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड -नांदगाव-ओंड- रत्नागिरी राज्य मार्ग हा कोकणात जाण्याचा एक उत्तम पर्याय बनला आहे. या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याने या मार्गावर सध्या बाहेरची व स्थानिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र वाहनधारक प्रचंड वेगाने वाहन चालवत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी धर्माप्लास्टचे पांढरे पट्टे व गतिरोधक बनवावेत अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत सुकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कराड येथील मार्ग प्रकल्प उपविभागाचे सहाय्यक अभियंता अक्षय देसाई यांना याबाबतचे निवेदन प्रशांत सुकरे यांनी दिले. यावेळी राहुल पाटील, वसंत पवार, मच्छिंद्र कुंभार यांच्यासह तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव एसटी स्टँड परिसरातून हा रस्ता जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नांदगावची लोकवस्ती आहे. जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दवाखाने,दुकाने आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना, लहान मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे. या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. तर भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचाच भाग म्हणून या परिसरात थर्माप्लास्टचे पांढरे पट्टे व गतिरोधक बनवले जावेत. याबाबत कार्यवाही त्वरित करावी असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, खासदार निवास पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आली आहेत.
यावेळी बोलताना अभियंता देसाई म्हणाले, आपण केलेली ही पहिलीच लोकांच्यातून आलेली मागणी आहे व ती योग्य आहे. मागणीचा आम्ही सकारात्मक विचार करू. या संदर्भात सेफ्टी ऑडिट रिपोर्ट आम्ही त्वरित मागून घेऊ व त्यानुसार उपाययोजना करू.
मी नांदगाव ग्रामपंचायत सदस्य या नात्याने प्रामुख्याने नांदगाव एसटी स्टँड परिसरात थर्माप्लास्टचे पट्टे व गतिरोधक करा अशी मागणी केली आहे. पण याबरोबरच या मार्गावर असणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. असेही प्रशांत सुकरे यांनी यावेळी देसाई यांच्याशी बोलताना मत व्यक्त केले.