“मॉडेल मडगाव” म्हणजे गुन्हे आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक : प्रभव नायक
मडगाव :
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व “गट क” भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत केल्या जातील, असा पुनरुच्चार करून, शासकीय नोकऱ्या गुणवत्तेवर दिल्या जातात यावर भर दिला होता. त्यानंतर लगेच मडगाव नगरपालीकेने 11 एलडीसींची थेट भरती करणारी जाहिरात कशी दिली? कुठे आहे पारदर्शकता? हेच का ते “मॉडेल मडगाव”? असा संतप्त सवाल युवा नेते प्रभव नायक यांनी विचारला आहे.
आकें येथे समाजकंटकांकडून बंदुकीच्या धाकावर नागरिकांना धमकी देण्याच्या घटनेने शांतताप्रेमी मडगावकरांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केला आहे. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हे राजकारणातले जाणते हल्ली प्रचार करीत असलेल्या “मॉडेल मडगाव” चे प्रतीक असल्याचे दिसते. मी या घटनेचा निषेध करतो आणि चौकशी आणि न्यायाची मागणी करतो, असे प्रभव नायक म्हणाले.
मडगाव नगरपालीकेने ११ एलडीसी आणि इतरांच्या भरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीवर मत व्यक्त करताना आणि आकें येथे बंदुकीच्या धाकावर नागरिकांना धमकावल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, प्रभव नायक यांनी राजकारणातल्या जाणत्यानी प्रोत्साहन दिलेले “मॉडेल मडगाव” हे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याचा टोला हाणला.
मडगाव नगरपालीकेतील एलडीसी पदे कर्मचारी निवड आयोगामार्फत का भरली जात नाहीत याचे उत्तर गोवा सरकारने मडगावच्या नागरिकांना द्यावे. सुशिक्षित तरुणांना गुणवत्तेवर नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. भविष्यातील घडामोडींवर मी बारकाईने लक्ष ठेवून आहे, असा इशारा प्रभव नायक यांनी दिला.
मडगाव येथील आकें परिसर हा नेहमीच शांतताप्रिय होता. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून गुन्हेगार मोकळेपणाने वावरत असल्याचे आजच्या घटनेने उघड झाले आहे. मला आशा आहे की पोलीस जलदगतीने कारवाई करतील आणि सर्व गुन्हेगारांना पकडतील, असे प्रभव नायक म्हणाले.
मडगावातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर त्यांना खरोखरच मडगावकरांची काळजी असेल तर या दोन्ही मुद्द्यांवर बोलतील. मडगाव नेहमीच नागरीकांसाठी सुरक्षित राहावे, ही त्यांची जबाबदारी आहे, असे प्रभव नायक म्हणाले.