google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

Madgaon: ‘मडगाव बसस्थानकाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी ‘ते’ २ कोटी खर्च करा’

Madgaon :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 22 डिसेंबर 2023 रोजी नवीन जुवारी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे नितीन उद्घाटन करणार आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतू, यावेळेला भाजप सरकारने पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी केलेला 2 कोटींचा खर्च टाळावा आणि सदर निधीचा वापर मडगाव (Madgaon) बसस्थानकाच्या अत्यंत आवश्यक दुरुस्तीसाठी करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

मागील विधानसभेच्या अधिवेशनात मला दिलेल्या उत्तरावरून नवीन झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमावर सरकारने 2 कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. बेजबाबदार भाजप सरकारने करदात्यांच्या पैशाची उढळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. राज्यावरील एकूण कर्जाचे ओझे 35000 कोटींवर पोहोचले असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खर्चकपातीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

भाजप सरकारने दक्षिण गोवा आणि विशेषतः सासष्टी तालुक्याला नेहमीच सावत्र वागणूक दिली आहे. मडगाव (Madgaon) बस स्टँड हे संपूर्ण दक्षिण गोव्याचे प्रवेशद्वार आहे. या बसस्थानकाचा शासनाच्या महसुलात वाटा आहे. या बसस्थानकातून गेल्या 4 वर्षात शासनाला 1.93 कोटींचा नफा झाला आहे. दुर्दैवाने तेथील बसशेडची देखभाल करण्यासही भाजप सरकार अपयशी ठरले आहे. बसस्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

काँग्रेस सरकारने जून 2011 मध्ये मडगाव येथे “अल्ट्रा-मॉडर्न ट्रान्सपोर्ट हब” साठी पायाभरणी केली होती. 16 एकर जागेवर पसरलेल्या या प्रकल्पात रिटेल मॉल, हॉटेल ब्लॉक, कॉर्पोरेट ब्लॉक, पार्किंग सुविधा आणि सुसज्ज अशा आधुनिक बस स्थानकाचा समावेश होता. दुर्दैवाने 2012 मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने सदर प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

मडगाव बसस्थानकात योग्य प्रसाधनगृहे व स्वच्छतागृहे नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकावरील शेडमध्ये प्रवाशांसाठी विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नाही. बहुतांश बाक तुटलेले किंवा खराब झालेले आहेत. शेड जीर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असे युरी आलेमाव यांनी निदर्शनास आणले आहे.

2027 पर्यंत मडगावमध्ये “अल्ट्रा-मॉडर्न ट्रान्सपोर्ट हब” बांधण्याचे भाजप सरकारला शक्य होणार नाही हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुवारी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावर वायफळ खर्च न करता सदर 2 कोटींचा वापर करुन मडगाव (Madgaon) बस स्थानकावर सुविधा उपलब्ध द्याव्यात अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!