‘रोहन खंवटेनी ‘पर्यटक सुरक्षा व सुरक्षितता धोरण-२०२२’ प्राधान्याने बनवण्यावर लक्ष द्यावे’
पणजी :
गोव्यातील विविध पर्यटन स्थळांवरील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे अनुशासनहीनता वाढत असून जीवघेणे अपघात होत आहेत. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांची सुरक्षा आणि सुरक्षितता धोरण प्राधान्याने बनवण्यावर भर द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. दूधसागर धबधब्याजवळ पूल कोसळल्याच्या घटनेने ४० पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनेवर ते प्रतिक्रिया देत होते.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी इतर खात्यांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता आपले खाते कार्यक्षम करण्यावर भर द्यावा. जेटी धोरण बनविण्याची जबाबदारी कॅप्टन ऑफ पोर्टस किंवा नदी परिवहन खात्याची आहे. पर्यटन खात्याने आपली जबाबदारी योग्य पाडण्याची गरज आहे, असा सल्ला अमित पाटकर यांनी दिला.
#BridgeCollapsesAtDudhsagar Dear @TourismGoa Minister @RohanKhaunte, focus on making TOURIST SAFETY & SECURITY POLICY-2022 on PRIORITY. What happened to the Goa Tourism Master Plan? What is the status of Swadesh Darshan Projects? What happened to Beach Cleaning Scam? @INCGoa pic.twitter.com/EkEEgvc6GD
— Amit Patkar (@amitspatkar) October 15, 2022
पर्यटन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही? गोवा पर्यटन मास्टर प्लॅनचे काय झाले? स्वदेश दर्शन प्रकल्पांची स्थिती काय आहे? बहुचर्चित हॉट एअर बलूनचे काय झाले? ॲम्फिबीयन वाहन कोठे आहे? हॉप ऑन हॉप ऑफ बसेस कुठे आहेत? पर्यटन हेलिकॉप्टर कुठे आहेत? सी प्लेन्स कुठे गेली? असे प्रश्न विचारून, भाजप सरकारने सुरू केलेल्या या प्रकल्प कुठे गायब झाले ते पर्यटनमंत्र्यांनी सांगावे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असताना गोवा विधानसभेत उघड केलेल्या बीच क्लीनिंग घोटाळ्याचे काय झाले हे गोव्यातील जनतेलाही जाणून घ्यायचे आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
गोव्यातील समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळांवर अनेक बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत. सत्तेतील लोकांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर होमस्टेचा धंदा फोफावला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट घोटाळ्यात पर्यटन विभागाचे अधिकारी सहभागी आहेत. मार्केटिंग आणि प्रमोशनल इव्हेंटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मोदींच्या क्रोनी कॅपिटलिस्टला खूश करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी पर्यटनमंत्र्यांनी आपले प्राधान्यक्रम ठरवावेत, असे अमित पाटकर म्हणाले.
काँग्रेस पक्ष भाजप सरकारला गोमंतकीयांच्या भावना आणि आकांक्षांची गळचेपी करू देणार नाही. गोव्याची अस्मिता जपण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू, असे अमित पाटकर यांनी सांगितले.