गोवा
6 आणि 7 रोजी परिक्रमाचा ‘अकॅडेमिक फोरम’
पणजी :
राज्याचा ज्ञानमहोत्सव मानला जाणाऱ्या परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्या ‘अकॅडेमिक फोरम’ची पाचवी आवृत्ती येत्या ६ आणि ७ जानेवारी फोंड्यातील रोजी मंदिर येथे होत आहे. कला आणि संस्कृती विभाग, कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालय आणि राजीव गांधी कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांच्या या ज्ञानमहोत्सवातील पहिल्या दिवशी उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना सहभागी होता येणार आहे. पहिल्या दिवशी ‘करिअर अॅट क्रॉसरोड्स’ या विषयावर विविध मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, कार्यक्रमाची सुरुवात सध्या जयपूरमध्ये सेवा बजावत असलेले गोव्याचे आयएएस अधिकारी आशुतोष पेडणेकर यांच्या बीजभाषणाने होणार आहे. त्यानंतर पीईएस रवी सीताराम नाईक उच्च माध्यमिक मधील शिक्षक फ्रान्सिस्को कार्दोज यांचे ‘चाकोरी कशी तोडावी’ यावर सत्र होणार आहे. त्यानंतर ‘अॅप्टिट्यूड आणि चॅलेंजेस’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात गोवा विद्यापीठाचे प्रा.राहुल त्रिपाठी, व्ही.एम.साळगावकर कॉलेज ऑफ लॉच्या सहाय्यक प्राध्यापिका मेघना कापडी; उच्च शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक संचालक भक्ती नाईक, व फोंडा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम नाईक सहभागी होणार आहेत. कला अकादमी थिएटर आर्ट कॉलेजचे प्राचार्य प्रा.राजय पवार परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवतील.
‘झिरोलॉग’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्रामध्ये विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेले राज्यातील तरुण आपल्या एकूण प्रवासाबद्दल बोलतील. यात सुवर्ण पदक विजेती विंड सर्फर कात्या कोएल्हो (स्पोर्ट्स करिअर), वाकाओ फूडचे सीईओ साईराज धोंड (उद्योजकता), आर्किव्हिस्ट बालाजी शेनॉय (करिअर इन आर्काइव्ह्ज), बेटर इंडियाच्या ब्रँड ग्रोथ हेड तन्वी राऊत देसाई (डिजिटल जर्नलिझम) आणि आशियारच्या संस्थापिका सुनाया शिरोडकर (रोबोटिक्स) यांचा समावेश आहे. अमेय उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जाण हे समारोपाचे भाषण करतील.
तर दुसरा दिवस हा महाविद्यालये आणि इतर संस्थांसाठी असून, यामध्ये प्रामुख्याने परिक्रमा 0.6 च्या स्पर्धांसाठी हे एक पूर्वतयारीबद्दल तपशीलवार मार्गदर्शन करण्यात येईल. यामध्ये उदय चारी (बिग 92.7fm), सूरज पिंगे (लोकसंशोधक), कौस्तुभ नाईक (लेखक आणि संशोधक), कलानंद बांबोळकर (कलाकार आणि शिक्षक), शुभम खांडेपारकर (मॉडेल आणि कलाकार), युगांक नायक (सहाय्यक प्राध्यापक, गोवा विद्यापीठ), सुविधा नाईक (भरतनाट्यम कलाकार), आणि रोहित खांडेकर (सूत्रसंचालकी आणि अभिनेता) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
अकॅडेमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी उच्च माध्यमिक शाळांनी आपल्या प्रवेशिका knowledgeterminus@gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्या सचिव उर्वशी नाईक यांनी केले आहे.