पणजी:
कुस्तीपटूंवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या आरोपीला भाजपची सत्ता आश्रय देत असल्याचा आरोप करत गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रधानमंत्र्यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणेची मुल्ये विरगळू लागली आहे असे म्हटले आहे. तसेच ही आंदोलने आता दिल्ली बरोबर इतर राज्यातही होणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
चोडणकर यांनी गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा दिल्ली येथे आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली. भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता साक्षी मलिक आणि इतरांची चोडणकर यांनी भेट घेतली आणि या खेळाडूंना पाठिंबा दिला.
“न्याय मागणाऱ्या या खेळाडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला आज एक महिना उलटला. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या खासदारावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांचे सत्य लोकांपुढे आणण्यात उत्सुक नाहीत असे दिसते. अन्यथा कारवाई केली असती,” असे चोडणकर म्हणाले.
मोदी सरकारची सत्ता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणेची मुल्ये वेगाने वितळत आहे, असेही ते म्हणाले.
“जेव्हा आमच्या मुलींना न्याय मिळत नाही व या लैंगिक छळात गुंतलेल्या आरोपीविरुद्ध कारवाई होत नाही तेव्हा या घोषणेला काही अर्थ राहत नाही. देशाच्या मुलींच्या रक्षणाची या सरकारने दिलेली प्रदीर्घ आश्वासने का फोल ठरली आहेत, असा सवाल त्यांनी केला.
चोडणकर म्हणाले की, एकीकडे भाजप सरकार क्रीडा क्षेत्रात खोटेपणाची आशा दाखवत आहे आणि दुसरीकडे त्यांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. “आपण दोशी असल्याचे माहित असल्याने आरोपी व्यक्ती आवश्यक चाचण्या किंवा तपास टाळत आहे का,’ असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास अन्य राज्यात आंदोलन छेडू शकते, असा इशारा चोडणकर यांनी सरकारला दिला. ‘मला वाटते की लवकरच हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांमध्ये ही आंदोलन सुरू होईल’, असा दावा चोडणकर यांनी केला.