google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

रोहन खंवटेंच्या खाते अभ्यासावरुन काँग्रेसचा टोला…

पणजी :

पर्यटनमंत्री रोहन खंवटे भाजपमध्ये गेल्यानंतर भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना आपल्याच खात्याच्या कामकाजाच्या कार्यकक्षेची माहिती नाही. पर्यटन मंत्र्यांनी आपल्या खात्याचे अधिकार व व्याप्ती यावर प्रशिक्षण घेणे गरज आहे, असा टोला काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

जेटी धोरणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांपैकी बहुतांश आक्षेप हे “कट पेस्टचे” काम आहे आणि त्यावरून सदर आक्षेप घेण्याऱ्यांचा हेतू दिसून येतो ह्या पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी हळदोणचे भाजपचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांचा पर्यटन धोरण व मास्टर प्लॅन हे “कॉपी पेस्ट” काम असल्याचा दावा करणारा विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

सुमारे ५ ते ६ कोटी खर्चाच्या मास्टर प्लॅन आणि पर्यटन धोरणाचे ‘कॉपी पेस्ट’ काम करण्यामागे सल्लागाराचा हेतू काय होता, हे रोहन खंवटे यांनी जनतेला सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.


पर्यटन खात्याने नुकत्याच जारी केलेल्या आदेशामुळे उपद्रव निर्माण करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत, असे पर्यटनमंत्र्यांनी म्हटले आहे. गृहखात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलिसांना पर्यटन खाते अधिकार कसे देऊ शकते? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.


पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या अखत्यारीत येत नसलेले प्रस्ताव किंवा योजनांच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणे बंद करावे. रोहन खंवटेनी बजबजपुरी व भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या भ्रष्ट आणि घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर आधी कारवाई करावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.


पर्यटन मंत्री रोहन खंवटे हे ‘बळकाव बहाद्दर’ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी जेटी धोरण तयार करून बंदरे आणि नदी परिवहन खात्याचे अधिकार बळकावण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी गृहखात्यात घुसखोरी केली आहे. त्याची कृती ही त्यांच्या भूतकाळाचे प्रतिबिंब आहे. जुन्या सवयी जाण्यास वेळ लागतो असा अमरनाथ पणजीकर यांनी टोला लगावला.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी हिम्मत दाखवून भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात सुरू केलेले विविध पर्यटन प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती यावर श्वेतपत्रिका काढावी. त्यांनी स्वत: अपक्ष आमदार असताना उघड केलेल्या बीच क्लीनिंग घोटाळ्याचे काय झाले हे लोकांना सांगावे. समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळांवरील विवीध उपक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी पर्यटन विभागाच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येचा तपशील त्यांनी उघड करावा, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!