google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘का’ केले काँग्रेसने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन?

मडगाव :
गोव्यातील भाजप सरकार हे एकमेव सरकार आहे ज्याला राज्यपाल, विधानसभा सभापती आणि लोकायुक्त यांच्याकडून “भ्रष्टाचाराचे प्रमाणपत्र” मिळाले आहे. भाजप सरकारच्या कॅबिनेट मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनीही आपल्या सहकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला आहे. पंचायत आणि नगरपालिका निवडणुकीतील असंवैधानिक, अलोकतांत्रिक कारभारावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही भाजप सरकारला फटकारले आहे. गोव्यातील भाजप सरकारच्या या कामगिरीबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, असा सणसणीत टोला काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवताना हाणला.

मडगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी कॉंग्रेसचे राज्य माध्यम प्रमूख अमरनाथ पणजीकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सावियो डिसील्वा तसेच रामकृष्ण जल्मी हजर होते. भाजपचा ‘विकासीत भारत’ हा कोकणी भाषेतील ‘घर मोडून माटोव घालप’ या उक्तीप्रमाणे आहे. पंतप्रधानांच्या रॅलीला मडगाव येथील बसस्थानकाचे स्थलांतर करून तेथे मंडप उभारल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे याकडे अमित पाटकर यांनी लक्ष वेधले.

गोव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निती आयोगाकडून देशातील सर्वोच्च बेरोजगारी दराचे प्रमाणपत्र मिळाले आहे. गोव्यातील वाढत्या बेरोजगारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करणार का? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आमची जीवनदायीनी आई म्हादईची हत्या केली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की, त्यांनी कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्याची घोषणा करावी. म्हादई वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करावे अशी मागणी अमित पाटकर यांनी केली. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आयात केले, आता आपण आपल्या स्थानिक वाघांचे रक्षण करूया, असे अमित पाटकर म्हणाले.

गोव्याचे कोळसा केंद्रात रुपांतर करणारे आणि जैवविविधतेने समृद्ध पश्चिम घाट, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य नष्ट करणारे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बाजूने राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानाचे प्रचंड नुकसान करणारे तीन रेखीय प्रकल्प रद्द करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर करणे महत्वाचे आहे. भाजप सरकारने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आक्षेप धुडकावून लावत नदी राष्ट्रीयीकरणाला मंजुरी दिली. माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पंतप्रधान मोदींच्या दबावाखाली हे केले, असा दावा अमित पाटकर यांनी केला आहे.

गोवा हे भारतातील आणि परदेशातील गुन्हेगारांचे आवडते “मर्डर डेस्टिनेशन” बनले आहे. गोव्यातील होमस्टे आणि रिसॉर्ट्स मारेकरी आणि खुन्यांसाठी सुलभ ठिकाणे बनत आहेत. गोव्याबाहेरील एक आई आपल्या मुलाला मारण्यासाठी गोव्याला येते. ड्रग्सच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्यचा संशय असलेल्या सोनाली फोगटच्या संशयास्पद मृत्युचा तपास पूर्ण झालेला नाही. पोलिसांच्या माहितीशिवाय मृतदेह राज्याबाहेर नेले जातात. गॅस गळतीमुळे पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्यात आले आहे. काब दे राम येथे पतीने पत्नीची हत्या केली. सिद्धी नाईक हत्येचे गूढ अद्यापही उकललेले नाही, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.

गोव्यावर आज 36000 कोटीचे कर्ज आहे, त्यामुळे प्रत्येक गोमंतकीयांवर 2.20 लाखांचा बोजा आहे. यावरुन केंद्रातील मोदी सरकारचा गोव्याला भक्कम पाठींबा मिळत असल्याचा दावा फोल ठरतो असे अमित पाटकर म्हणाले.

मडगावातील “विकसीत भारत” रॅलीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेदांता, जेएसडबल्यू व अदानी सारख्या क्रोनी भांडवलदाराना गोवा सरकारचे मागील कित्येक वर्षाचे देय फेडण्याचा आदेश देतील की त्यांचे देय माफ करण्याची घोषणा करतील? असा खोचक सवाल अमित पाटकर यांनी केला.

विकसीत भारत रॅलीच्या जाहिरातीतून दक्षिण गोवा खासदार फ्रांसिस सार्दिन यांना का वगळले असा प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी विचारला. भाजपने मडगाव बसस्थानक बंद करुन तेथील लहान व्यापाऱ्यांवर अन्याय केला आहे असे ते म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!