गोव्याचे नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक अर्मांडो कुलासो यांना प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाकडून पुरस्कार यादी गुरुवारी (2 जानेवारी) जाहीर झाली. 71 वर्षीय कुलासो स्पोर्ट्स कोचिंगमध्ये प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे पहिलेच गोमंतकीय ठरले आहेत.
अर्मांडो कुलासो यांचा जन्म 22 जून 1953 रोजी पणजीत व्हिन्सेंट साल्वादोर कुलासो आणि क्लॅरिना कुलासो यांच्या पोटी झाला. अर्मांडो लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. परंतु त्यांनी कठीण परिस्थितीही हार न मानता आईला आधार देत आपली फुटबॉलची आवड जोपासली. ते कधीही आपल्या ध्येयापासून भरकटले नाहीत. जोसेफ कास्टी आणि फादर थॉमस यांनी सुरुवातीला अर्मांडो यांना फुटबॉल (Football) खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुढे त्यांनी आपल्या करिअरदरम्यान अनेक महत्वाची पदे भूषवली.
1985-85 पासून कुडतरी येथील फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात कुलासो कार्यरत आहेत. धेपो स्पोर्टस क्लबचे प्रशिक्षक या नात्याने कुलासो यांनी राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धा विजेतेपद दोनवेळा (2004-05, 2006-07), तर आय लीग विजेतेपद (2007-08, 2009- 10, 2011-12) तीनवेळा पटकावले. मे 2011 मध्ये त्यांची भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2008 मध्ये धेम्पो क्लबने एएफसी कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. अशी किमया साधलेली ते पहिले भारतीय फुटबॉल प्रशिक्षक ठरले होते.
मनू भाकेर, डी. गुकेशसह चौघांना ‘खेलरत्न’
केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा केली. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.