‘चार राज्यांमध्ये सुरू करणार कोकणी शिक्षण केंद्रे’
वास्को:
मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना, राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले की त्यांनी गोवा विद्यापीठाला चार राज्यांमध्ये कोकणी शिक्षण केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मुरगाव तालुक्यातील सात पंचायतींच्या सरपंच व पंच सदस्यांच्या भेटीदाखल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई एक दिवसाच्या मुरगाव तालुक्यातील पंचायत दौऱ्यावर होते. यावेळी चिखली पंचायत सभागृहात तसेच उपासनगर – सांकवाळ येथे कला भवन येथे आयोजित सरपंच व पंच सदस्यांबरोबर घेतलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल श्रीधर पिल्लई यांनी सांगितले. देशात चार राज्यात कोकणी भाषेचा प्रभाव आहे. कोकणी ही गोव्याची मातृभाषा आहे. त्याचा मी आदर करतो, असे ते म्हणाले. पंचायत निवडणुकीनंतर तसेच मतमोजणीनंतर मी पुन्हा एकदा गोवा भ्रंमती चालू केली असून देवाला वाटले, तर सहा महिन्यांत गावे आणि पंचायतींना भेटी देईन, असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ यांनी कोकणी भाषेतून भाषण केल्याबद्दल राज्यपालांची स्तुती केली.
पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, “केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथे मोठ्या लोकसंख्येची मातृभाषा कोकणी आहे. हे लक्षात घेऊन आणि गोवा विद्यापीठाचा चॅनल सेलर म्हणून मी या चार राज्यांमध्ये कोकणी शिक्षण केंद्रे सुरू करण्याचे निर्देश गोवा विद्यापीठाला दिले आहेत. कोचीन आणि मेंगलोर येथे लवकरच केंद्रे सुरू केली जातील,” असे ते म्हणाले.
“संविधानानुसार मातृभाषेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि मी कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. “कोकणी ही प्राचीन आणि अतिशय सुंदर भाषा आहे आणि तिचा प्रचार करणे ही काळाची गरज आहे असे,” पिल्लई म्हणाले. कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ यांच्या उपस्थितीत कुठ्ठाळी मतदारसंघातील पाच पंचायत मंडळांच्या पंच आणि सरपंचांशी संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.