‘स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे हे पुण्यकर्म’
काणकोण :
गोवा मुक्तीलढ्यात स्वातंत्र्यसैनीक व त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या योगदानामुळेच गोवा भारतीय प्रजासत्ताकाचा घटक बनला. स्वातंत्र्यसैनीकांचे स्मरण करणे हे पुण्यकर्म आहे असे उद्गार विशाल पै काकोडे यांनी काढले.
श्रद्धानंद विद्यालय, पैगींण काणकोण येथे आयोजित स्व. कुमुदिनी कवळेकर स्मृती काणकोण तालुका प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील पैंगिणकर, मुख्यध्यापीका सीमा प्रभुगांवकर, हेमंत कवळेकर, सुचीता राजू नाईक तसेच राधा कवळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
माझे शालेय शिक्षक दामोदर कवळेकर यांनी आपली पत्नी स्वातंत्र्यसैनीक कुमुदिनी कवळेकर यांच्या स्मृतीस सुरू केलेल्या स्पर्धेत प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग म्हणजे माझे भाग्य आहे. विद्यार्थ्यानी गोवा क्रांती लढा तसेच मुक्ती लढा, विद्यार्थी आंदोलने याचा इतिहास वाचल्यास, सत्यासाठी लढण्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल असे विशाल पै काकोडे म्हणाले.
कवळेकर कुटुंबियांनी सुरू केलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेने विद्यार्थ्याना गोव्याचा इतिहास व मुक्तीलढ्यातील शुरवीरांच्या कार्याची ओळख होते असे सुनील पैंगिणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिवंगत कुमुदिनी कवळेकर यांच्या तसबिरीला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याद्यापीका सीमा प्रभुगांवकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करण्यास हातभार लावणारे कवळेकर कुटुंबिय तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचा खास उल्लेख केला व सदर स्पर्धा आयोजनाने गोवा मुक्तीलढ्यात योगदान दिलेल्याचे स्मरण होते असे सांगितले.
प्रश्नमंजूषा स्पर्धेचे प्रथम पारितोषीक तुडळ माध्यमीक विद्यालय गांवडोंगरी,द्वितीय पारितोषीक श्री मल्लिकार्जून माध्यमीक विद्यालय, चार रस्ता, तृतिय पारितोषीक गुरूकुल विद्यालय काजूमळ व सेंट तेरेझा ऑफ जिझस माध्यमीक विद्यालय यांनी विभागून तसेच उत्तेजनार्थ पारितोषीक श्री दामोदर विद्यालय, लोलये यांनी पटकावली.
प्रश्नमंजूषा स्पर्धेचे संचालन शिक्षक सागर वेळीप यांनी केले. स्वाती खोलकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संकेत वारीक यांनी केले.