google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘काँग्रेसने संपत्ती निर्माण केली, मोदी सरकार ती विकत आहे’


पणजी :

आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सरकार चालवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले कारण ब्रिटिशांनी तिजोरी रिकामी केली होती. त्या परिस्थितीतही त्यांच्या दूरदृष्टीने देशात विविध संस्था आणि प्रकल्पांच्या रूपात भक्कम साधनसूविधा निर्माण केली ज्याचा उपयोग भारताच्या सर्वांगिण प्रगतीत झाला. दुर्दैवाने मोदी सरकार आज देशाच्या संपत्तीची एकामागून एक विक्री करत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.पणजी येथील काँग्रेस भवनात सरचिटणीस अॅड. श्रीनिवास खलप आणि उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेल्या स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना व इतर गोमंतकीयांना प्रवेश नाकारण्याच्या भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले की, मागील ७० वर्षांतील ७४ विमानतळांच्या तुलनेत गेल्या आठ वर्षांत जवळपास ६६ नवीन विमानतळ निर्माण झाले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर काँग्रेस सरकारचा भर होता हे पंतप्रधानांना कळायला हवे, असे अमित पाटकर म्हणाले.

आयआयटी-खरगपूर, ललित कला अकादमी, एम्स्, भारताची हरित क्रांती, १९६२ मध्ये स्थापित केलेला पहिला संगणक, १९७० ची धवल क्रांती, भारताची पहिली अणुचाचणी, आर्यभट्ट उपग्रहाचे प्रक्षेपण, गोव्यात १९८३ चे चोगम रिट्रीट, अंतराळात पहिला अंतराळवीर पाठवणे, माहिती तंत्रज्ञान क्रांती, भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हे काँग्रेस सरकारने निर्माण केलेले काही महत्वाचे प्रकल्प व योजना आहेत ज्यांनी भारताला आकार दिला, असा दावा अमित पाटकर यांनी केला.प्रत्येक कार्यक्रम व सोहळ्यानंतर भाजप सरकारची धोरणे बदलत आहेत, असेही कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यातील पर्यटन उद्योगासाठी एक गेम चेंजर असेल असे भाजपने २००४ मध्ये सांगितले होते. इफ्फी महोत्सव आंतरराष्ट्रीय फ्रोड फेस्टीव्हल ठरला आहे. भाजप सरकारने वचन दिलेले कन्वेंशन सेंटर कुठे आहे? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

आयुर्वेद आणि निसर्गोपचार केंद्र गोव्यातील पर्यटनाला चालना देऊ शकतात, असे पंतप्रधानांनी काल सांगितले. कोळसा वाहतूक सुलभ करण्यासाठी पर्यटन विभाग जेटी धोरण करण्यात व्यस्त आहे. विदेश वाऱ्यांवर वायफळ खर्च करुन पर्यटन उद्योगाला रसातळाला नेले. पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्याही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पर्यटन विभाग अपयशी ठरला आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस सरकारने तुष्टीकरणासाठी पैसा खर्च केल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचे खंडन करून काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आमच्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी संविधानात ७३व्या आणि ७४व्या दुरुस्तीसारखे कायदे आणले, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, मनरेगा आणि इतर अनेक कायदे आणि योजना भाजप सरकारला जनतेचे तुष्टीकरण आहेत असे वाटत असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे असे अमित पाटकर म्हणाले.


मोपा विमानतळावर प्रवेश नाकारून अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेची माफी मागावी अशी माझी मागणी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांना नवीन विमानतळाला भेट देण्याचे खोटे निमंत्रण दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात भाजपला पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी गर्दी जमवायची होती, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

मोपा विमानतळाच्या उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचा आणि दक्षिण गोव्याच्या खासदारांचा उल्लेख न करण्याच्या सरकारच्या कृतीचा काँग्रेस पक्ष निषेध करतो. मोपा विमानतळ ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, असे अमित पाटकर म्हणाले.


कांपाल पणजी येथे जागतिक आयुर्वेदिक काँग्रेसचे आयोजन करून वाहतुक कोंडी आणि वाहतूक बंद करून नागरिकांची गैरसोय केल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर केला. काल पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आयुष रुग्णालयाच्या परिसरात भाजप सरकारने त्याचे आयोजन का केले नाही, असा सवाल काँग्रेस अध्यक्षांनी केला.

अ‍ॅड. श्रीनिवास खलप यांनी जागतिक आयुर्वेद काँग्रेसच्या स्टॉल्सवर गांजाचा घटक असलेल्या औषधांची विक्री उघडकीस आणली. सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गांजाची विक्री करण्यास परवानगी मिळणे ही एक गंभीर समस्या आहे असे ते म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!