सुभाष वेलिंगकरांना मुख्यमंत्री संरक्षण देत आहेत : डॉ. अंजली निंबाळकर
पणजी :
भारतीय जनता पक्षाला गोव्यातील विविध समुदायांमध्ये फूट निर्माण करून मूळ मुद्द्यांवरून लक्ष वळवायचे होते, मात्र सतर्क गोमतकीयांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मुख्य गुन्हेगार सुभाष वेलिंगकर यांना संरक्षण देत आहेत, असा सणसणाती आरोप गोव्याच्या प्रभारी कॉंग्रेस सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि हळदोणचे आमदार ॲड. कार्लोस फरैरा यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जातीय सलोखा राखण्याचे गोमंतकीयांना आवाहन केले.
पर्यावरण, शेतीयोग्य जमीन, डोंगर, नद्या आणि गोव्याचा वारसा यांच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष सदैव गोमंतकीयांच्या पाठीशी राहील, असे डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.
आज भाजप सरकार गोव्याचे विध्वंसक ठरले आहे. भाजप जमीन आणि रिअल इस्टेट माफियांना प्रोत्साहन देत आहे, असा दावा डॉ.अंजली निंबाळकर यांनी केला.
बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सुभाष वेलिंगकरांना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडून संरक्षण मिळत आहे हे आता स्पष्ट झाले आहे. वेलींगकर हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लपले असण्याची शक्यता आहे, असे डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या.
काँग्रेस पक्ष विविध समुदायांमध्ये जातीय फूट आणि द्वेष पसरविण्याच्या विरोधात आहे. सर्वांना एकत्र ठेवण्याची काँग्रेसची विचारधारा आहे, असे प्रतिपादन डॉ.अंजली निंबाळकर यांनी केले.
गोव्यातील काँग्रेस नेते गोवा आणि गोमंतकीयांचे सर्व मुद्दे मांडत आहेत आणि आम्ही भाजपचा हुकूमशाही अजेंडा गोमंतकीयांवर लादू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी गोमंतकीयांना दिले.