‘का’ केले शिक्षक संघातून शरद पवारांना बाजूला?
सातारा (महेश पवार) :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ(थोरात गट) आयोजित एक दिवशीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा आज दि. १७ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे होत आहे. शिक्षक संघटनेची आजवर झालेली अधिवेशने किंवा मेळाव्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार एकदाही दूर राहिले नाहीत. परंतु, या शिक्षण परिषद व मेळावा कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांच्या नावालाही स्थान दिले गेले नाही. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कुणालाही साधं निमंत्रण दिलं नाही. शरद पवार किंवा राष्ट्रवादीने याचं चिंतन करण्याची वेळ आली आहे.
शरद पवार आणि शिक्षक संघटनांचं नातं उभ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. किंबहूना शरद पवार यांच्या इतकी शिक्षकांना मदत इतर कोणत्याही राजकीय नेत्याने केली नाही. हा इतिहास शिक्षक संघ किंवा शिक्षक समितीला चांगलाच ठाऊक असावा. हे जरी खरं असलं तरी शिक्षक संघाने शरद पवारांना का डावललं? याची कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसनेच शोधावीत.
शिक्षक संघाने मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणे हे गैर नाही. परंतु संपूर्ण कार्यक्रमात केवळ सत्ताधाऱ्यांना स्थान देणं तसेच शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीला दूर ठेवणं यामागची कारणं शिक्षक संघाला महत्वाची वाटली असावी. किंबहुना गेल्या काही वर्षांतील अनुभव त्यांच्याकडे असावा. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात आणि बाळासाहेबांची शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीला या परिषदेपासून दूर ठेवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
याचा अर्थ पुरुषोत्तम जाधव यांनी शिक्षक संघाला राष्ट्रवादीपासून दूर करुन सत्ताधाऱ्यांच्या गोटात आणून राष्ट्रवादीवर एक प्रकारे मात केल्याचे बोलले जात आहे. शिक्षक संघ आापल्यापासून का दुरावला याचे चिंतन करण्याची वेळ शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे, हे मात्र नक्की