‘फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचेही आदेश दिले आहेत.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही.” असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेणार का? या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “जागावाटपावरही चर्चा झाली. मी खरं सांगू का? मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो ते १९९५ ला. दोन तू घे, ही मला दे.. हे मला जमणार नाही. माझ्याकडून ते होणार नाही” असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी या आधी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुंबईतील सुशोभिकरण असो वा इतर अनेक धोरणं असोत, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच ज्यावेळी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही राज ठाकरेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. तसेच अजित पवाराप्रमाणे आपण वागलो नसून वेगळा पक्ष काढल्याचं सांगत त्यांना टोलाही लगावला होता.
या आधी 2014 आणि 2019 साली राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा ते लोकसभेच्या रिंगणात असतील काय याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. पण यंदाही आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. तसेच आता कोणताही विचार न करता कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.