google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी विरोधकांची आघाडी’

केवळ एका कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या काँग्रेसने देशाचा विकास रोखल्यामुळे विकासाच्या लाभापासून सर्वसामान्य जनता वंचित राहिली. आदिवासी, दलित, मागासवर्गीयांची उपेक्षा करणाऱ्या काँग्रेसमुळे देश समस्यांच्या खाईत लोटला गेला, आणि समस्या सोडविण्यासाठी अन्य देशांचे उंबरठे झिजविण्याची वेळ काँग्रेसवर आली. आता विकासाचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यात वाहात आहेत, आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी जगातील देश भारताकडे आशेने पाहात आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राची ही शक्ती आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेसला लक्ष्य केले.

भ्रष्टाचार हटविण्याचा आमचा संकल्प आहे, तर भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी विरोधक आघाडी करून मोर्चे काढत आहेत, असा हल्ला पंतप्रधानांनी चढविला.


येत्या ४ जूनला देशातून काँग्रेसचा सफाया झालेला असेल, आणि जनतेच्या भरघोस पाठिंब्याने पुन्हा एकदा रालोआ सरकार सत्तेवर विराजमान होईल, असा विश्वास मध्य प्रदेशातील बालाघाट येथे एका विशाल जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हा नारा देशाच्या कानाकोपऱ्यात घुमत असून ही केवळ खासदारांना विजयी करण्याची निवडणूक नाही, तर विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देणारी निवडणूक आहे असे ते म्हणाले.


भारतात झालेल्या जी-२० परिषदेत जागतिक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले गेले तेव्हा प्रत्येक देशवासीयाला अभिमान वाटला. पूर्वी काँग्रेस सरकारे त्यांच्या समस्या घेऊन इतर देशांत जात असत, पण आता काळ बदलला आहे. आज जगातील मोठे देश समस्या सोडवण्यासाठी भारताशी चर्चा करतात. देशाची अशी स्थिती पाहून प्रत्येक भारतीयाचे मनोबल वाढते, असे ते म्हणाले.


काँग्रेसने सत्तेच्या लढाईत सामान्य जनतेच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, तपश्चर्या आणि बलिदानाकडे दुर्लक्ष केले, आणि भारतासारख्या गरीब देशाला आधुनिक रस्ते, महामार्ग, रेल्वे आणि विमानतळांची गरज नाही अशी भूमिका घेत देशाला विकासापासून वंचित ठेवले. शहरांपुरत्याच सुविधा मर्यादित ठेवण्याच्या काँग्रेसी राजकारणामुळे सर्वसामान्य जनता विकासाच्या लाभापासून वंचित राहिली, असा ठपका त्यांनी ठेवला.


आजपर्यंत कोणत्याही सरकारने आधुनिक पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला नसेल, एवढा खर्च आमचे सरकार करत आहे. भाजपा  सरकारने शिवनी-नागपूर 4 पदरी महामार्ग, गोंदिया-बालाघाट-शिवनी महामार्ग, नर्मदा प्रगती पथ बांधले. आधुनिक वंदे भारत ट्रेन सुरू केली. अमृत भारत स्टेशन अंतर्गत ८० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. विकसित मध्य प्रदेशातून विकसित भारताची ही मोदींची हमी आहे. हा बदल आणि विकास हा केवळ ट्रेलर आहे,  देशाला पुढे नेण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.  भारताला अजून पूर्ण क्षमतेने खरी दिवाळी साजरी करायची आहे. आधीच्या सरकारांनी ज्यांची उपेक्षा केली, ज्यांना विकासापासून वंचित ठेवले त्या दलित, मागास आणि आदिवासी समाजाला भाजपा ने सन्मान दिला आहे. सरकार गरीब आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करत आहे, परंतु काँग्रेस अजूनही आपल्या जुन्या आणि दुष्ट मानसिकतेत अडकली आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.

आमच्या सरकारने एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. काँग्रेसने कधीच आदिवासींच्या वारशाचा आदर केला नाही. गुरु गोविंद सिंग यांच्या सारख्या क्रांतिकारकांना काँग्रेसने स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जाही दिला नाही. काँग्रेसला स्वातंत्र्याचे श्रेय कोणत्याही आदिवासीला नाही तर आपल्या राजघराण्याला द्यायचे आहे, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसच्या घराणेशाही राजकारणावर कोरडे ओढले. इंडी आघाडीचे नेते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि मोदींना पराभूत करण्यासाठी त्यांनी युती केल्याचे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात या आघाडीच्या नेत्यांना मोदींना नव्हे, तर देशाच्या विकासाला रोखायचे आहे. आपली तिजोरी भरण्यासाठी राजकारणात आलेल्या लोकांनी मोदींना धमकावू नये, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!