द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!
नवी दिल्ली:
देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत.
या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.