देश/जग

राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक

मुंबई :

देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असून, देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या २५ तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विविध पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे ५० टक्क्यांच्या आसपास मते होती. पण, आदिवासी समाजातील महिला उमेदवार म्हणून विविध राजकीय व प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. १० लाख, ८६ हजार, ४३१ एकूण मत मूल्यांपैकी मुर्मू यांना साडे सहा लाखांपेक्षा अधिक मतमूल्य मिळेल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: