‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पुन्हा अपघात…
गांधीनगर :
वंदे भारत एक्सप्रेसला पुन्हा एक अपघात झाला. गाय समोर आल्याने एक्सप्रेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ही एक्सप्रेस ट्रेन मुंबईवरून गांधीनगर येथे जात होती. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, पहिल्या महिन्याभरातच तीन वेळा या एक्स्प्रेसला छोटे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रत्येकवेळी समोर आलेल्या जनावरांना धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास तिसऱ्यांदा या एक्स्प्रेसला तशाच स्वरूपाचा अपघात झाला.
गुजरातमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाल्यामुळे तिच्या पुढच्या भागाचे नुकसान झालं. वलसाडच्या अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला, एक गाय अचानक रेल्वेच्या समोर आल्यामुळे ही धडक झाली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर जवळपास अर्धा तास वंदे भारत एक्स्प्रेस अतुल रेल्वे स्थानकावर उभी ठेवण्यात आली होती. या अपघातामध्ये रेल्वेच्या कपलरच्या कव्हरचेही नुकसान झाले असून बीसीयू कव्हरचेही नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, रेल्वेमध्ये पाणीपुरवठा करणारा पाण्याचा पाईपदेखील नादुरुस्त झाला. या अपघातामध्ये प्रवाशांना कोणतेही नुकसान झाले नाही.
दरम्यान, गेल्या महिन्याभरात वंदे भारत एक्स्प्रेसला अशा प्रकारे अपघात होण्याची ही तिसरी घटना ठरली आहे. पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्याच दिवशी अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची वटवा आणि मणिनगर रेल्वेस्थानकादरम्यान काही म्हशींना धडक बसली होती. त्यावेळीही रेल्वेच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी लगेचच वडोदरा भागातील आनंद परिसरात पुन्हा या एक्स्प्रेसची एका गायीला धडक बसल्याची घटना घडली होती.