google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

कसा झाला अपघात? कारण काय? रेल्वे विभागाने सांगितला घटनाक्रम

बल्सोर :

ओडिशातल्या बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १,००० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? अपघाताची कारणं काय? तसेच या दुर्घटनेला कोण-कोण जबाबदार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेचा तपास पूर्ण झाला असून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या लोकांवर लवकरच कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे. या अपघाताबाबत प्रत्येकजण आपापल्या परीने तर्क-वितर्क लावत असताना रेल्वे विभागाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला.


रेल्वे विभागाने पत्रकार परिषदेत सांगितलं की, बहनगा रेल्वेस्थानकावर एकूण चार लाईन्स (रेल्वे मार्ग) आहेत. त्यापैकी मधल्या दोन लाईन्स आहेत ज्यावर कोणतीही रेल्वे थांबत नाही. बहनगा रेल्वेस्थानकावर न थांबता पुढे जाणाऱ्या रेल्वे या दोन लाईन्सवरून ये-जा करतात. तर दोन बाजूला असणाऱ्या दोन लाईन्स या बहनगा रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या रेल्वेंसाठी आहेत. यांना लूप लाईन्स म्हटलं जातं.अपघात झाला तेव्हा दोन्ही बाजूच्या दोन लूप लाईन्सवर दोन गाड्या आधीपासून उभ्या होत्या. त्यापैकी एका लाईनवर मालगाडी होती. बहनगा रेल्वेस्थानकावर न थांबणऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी मधल्या दोन लाईन्स उपलब्ध होत्या.

यावेळी चेन्नईवरून बंगळुरूमार्गे यशवंतपूर एक्सप्रेस येत होती, जी हावडा (पश्चिम बंगाल) येथे जाणार होती. तर दुसऱ्या बाजूने कोरोमंडल एक्सप्रेस येत होती. जी चेन्नईला जात होती. दोन ट्रेन्ससाठी दोन लाईन्स मोकळ्या होत्या. दोन्ही लाईन्सचं डायरेक्शन (दिशा) सेट होतं, रूट (मार्ग) सेट होते, सिग्नल यंत्रणाही सेट होती. दोन्ही रेल्वेंसाठी सिग्नल ग्रीन होते. ग्रीन सिग्नल असल्याने मोटरमनसाठी मार्ग मोकळा होता. याचा अर्थ मोटरमन त्याला परवानगी दिलेल्या वेगाने रेल्वे चालवू शकत होते.


कोरोमंडल एक्सप्रेससाठी १३० किमी प्रति तास ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी ही रेल्वे १२८ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावत होती. रेल्वे विभागाने याबाबत चौकशी आणि तपास करून निष्कर्ष काढला आहे की, ही रेल्वे तेव्हा १२८ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावत होती. तर दुसऱ्या बाजूने यशवंतपुरा एक्सप्रेस १२६ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावत येत होती. या गाडीसाठी देखील १३० किमी प्रति तास ही वेगमर्यादा निश्चित केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार सिग्नलमध्ये काहीतरी त्रुटी होत्या. परंतु ही केवळ प्राथमिक माहिती आहे. तपासाअंती खरं कारण समोर येईल. आम्ही सध्या चौकशी अहवालाची वाट पाहत असल्याचं रेल्वे विभागाने सांगितलं. तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्घटना केवळ कोरोमंडल एक्सप्रेसची झाली आहे. केवळ एकच ट्रेन क्षतीग्रस्त झाली. कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला जाऊन धडकली. त्या गाडीच्या इंजिनसह काही डबे मालगाडीवर चढले. ट्रेन पूर्ण वेगात होती. तर मालगाडी खूप वजनदार होती. त्यामुळे मालगाडी जागची हलली नाही. उलट प्रवाशांना घेऊन जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर चढली.


या अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे इकडे तिकडे पडले. या गाडीचे दोन डबे बाजूच्या लाईनवर पडले. या लाईवरून यशवंतपुरा एक्सप्रेस जाणार होती. यशवंतपुरा एक्सप्रेस १२६ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावत येत होती. मार्गात पडलेल्या कोरोमंड एक्सप्रेसच्या डब्यांना यशवंतपुरा एक्सप्रेस धडकली. त्यामुळे यशवंतपुरा एक्सप्रेसचादेखील अपघात झाला. या रेल्वेमधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!