
पणजी :
दुहेरी नागरिकत्व आणि ओसीआय कार्ड समस्या कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नव्हे तर गोमंतकीयांची सेवा म्हणून शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याची गरज आहे. ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहिला आहे. मात्र भाजप त्यांना सत्ता आणि त्यांचे अधिकार द्यायला तयार नाही, असे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख तसेच मिडीया प्रभारी हर्षद शर्मा यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या “दस साल अन्य काल” मुद्यांवर पत्रकार परिषदेला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांवर टीका केली.
केंद्रात तसेच गोव्यात भाजपची सत्ता आहे. असे असूनही, म्हादई, बेरोजगारी आणि अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी एसटी शिष्टमंडळाला वेळ न देता केवळ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटीची का वेळ दिली? असा सवाल सलमान खुर्शीद यांनी केला.
देशातील बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च आहे. नोकऱ्या नसलेल्या लोकांची संख्या 2014 मध्ये 1 कोटींवरून 2024 मध्ये 4 कोटींवर गेली आहे. 42 टक्के तरुण पदवीधर बेरोजगार आणि हताश आहेत. निती आयोगानुसार गोव्यात बेरोजगारीचा दर देशात सर्वाधिक आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते, परंतु त्यांनी जाचक शेती कायदा आणण्याचा प्रयत्न केला, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
विमानतळ, बंदरे आणि वीज यांवर अदानीची मक्तेदारी महागाईला कारणीभूत ठरत आहे. वाढिव कोळसा आणि वीजेच्या किमतींद्वारे लोकांच्या खिशातून पैसा काढून अदानीच्या शेअर्समध्ये आणि भाजपच्या इलेक्टोरल बाँडमध्ये टाकला जात आहे. अदानी, जिंदाल आणि वेदांता यांच्याकडून गेल्या 10 वर्षात गोवा सरकारचे सुमारे 2000 कोटी रुपये थकबाकी येणे आहेत. खेदाची गोष्ट म्हणजे भाजप सरकार पैसे वसूल करण्यासाठी काहीही करत नाही, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होत आहे. दररोज 86 महिलांवर बलात्कार होतो. 4 पैकी 3 आरोपी पसार होतात. तरीही भाजप बलात्काऱ्यांचा बचाव करते. मुख्यमंत्री, खासदारांसह भाजप नेते एससी, एसटी आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषणांची मोहिम राबवित आहेत, असे सलमान खुर्शीद यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून “आर्थिक अन्याय”, “सामाजिक अन्याय”, “राजनीतिक अन्याय” देशात होत आहे. शेतकरी त्रस्त आहेत, मोदानी-राजच्या फायद्यासाठी कामगारांची सतावणूक होत आहे, असे वक्तव्य सलमान खुर्शीद यांनी केले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीचे सदस्य सलमान खुर्शीद म्हणाले की, आम आदमी पार्टीसह विविध राजकीय पक्षांशी चर्चा सुरू आहे आणि लोकसभा उमेदवारींचा निर्णय सर्व सहमतीनेच घेवून नंतर जाहिर केला जाईल.