वन विभागातर्फे कर्मचारी, निसर्ग प्रेमींचा सन्मान
सातारा (महेश पवार) :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सातारा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग यांचे संयुक्त विद्यमाने व माऊली चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत माऊली ब्लड बँकेमार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्वातंत्राचा अमृत महोत्सवानिमित्त 75 अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने रक्तदान केले. सातारा जिल्ह्यात जंगलाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्याकरिता, मानव आणि वन्यजीव सहजीवनात बहुमूल्य योगदान देणारे, वन वणवा, अवैद्य वाहतुक, अवैद्य वृक्षतोड रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या क्षेत्रीय,कार्यालयीन कर्मचारी व निसर्गप्रेमी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वनसंवर्धन आणि संरक्षणासाठी वन विभागास सहकार्य करणारे संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकारी, जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी तसेच वन्यजीव प्रेमी यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कर्नल मोहन भालसिंग प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
कोल्हापूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. नानासाहेब लडकत वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापुर, उत्तम सावंत उप वनसंरक्षक, सातारा वन विभाग, सातारा, हरिश्चंद्र वाघमोडे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा तसेच वन, सामाजिक व वन्यजीव विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सातारा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सुधीर सोनवले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. उत्तम सावंत, उपवनसंरक्षक सातारा यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा) यांनी उपस्थितांचे आभार मानले.