‘यवतेश्वर ते महाबळेश्वर टॉय ट्रेन सुरु करा’
सातारा (महेश पवार) :
यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वरपर्यंत मिनी ट्रेन, टॉय ट्रेन सुरू करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सातारा शहर शाखेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्ह्याला निसर्गाची देणगी लाभलेली आहे. सातारा शहर हे डोंगरांच्या कुशीत वसलेले शहर आहे. निम्म्या सातारा शहरासाठी पाणीपुरवठा हा कास तलाव येथून केला जातो. छ. प्रतापसिह महाराजांनी या ठिकाणावरून पाट काढून पाणी सातारा शहरापर्यंत आणले आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली होती. नंतर बंदिस्त पाईपलाईनने पाणी आणण्यात आले. कास तलावाभोवती जंगल आणि पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर वाव आहे.
कास परिसरात अत्यंत दुर्मिळ अशी फुले येतात. कासपासून महाबळेश्वरपर्यंत एक ऐतिहासिक काळापासूनचा रस्ता जातो. हा रस्ता ४० किलोमीटर आहे. साताऱ्याच्या पर्यटनास चालना मिळावी, यासाठी यवतेश्वर पठार या ठिकाणी सर्व वाहने पार्क करून यवतेश्वर पठारापासून कास फाटा मार्गे महाबळेश्वर या अंतरासाठी माथेरान प्रमाणे मिनी ट्रेन, टॉय ट्रेन चालू करावी, अशी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, नगरसेवक धनंजय जांभळे उपस्थित होते.