‘सेव्ह म्हादई’साठी एकवटले सगळे विरोधी पक्ष
पणजी :
साखळी शहरातील सभेला दिलेली परवानगी दबावामुळे पालिकेने मागे घेतल्यानंतर ‘सेव्ह म्हादई’साठी 16 रोजी आयोजित केलेली सभा त्याच मतदारसंघात विर्डी येथे होणार आहे. जर मुख्यमंत्र्यांना म्हादई आपली आई वाटत असेल, तर त्यांनी या सभेला यावे. ही कोणत्याही पक्षाची सभा नव्हे, तर गोव्याची जीवनदायिनी म्हादईला वाचविण्याची चळवळ आहे. सर्व आमदारांनी सभेला उपस्थित राहून लढ्याला बळकटी द्यावी, असे आवाहन सहा पक्षप्रमुखांनी शनिवारी आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत केले.
या परिषदेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समील वळवईकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा आणि शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत यांची उपस्थिती होती.
साखळीतील सभा ही कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, तर ती पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्थांनी सुरू केलेल्या ‘सेव्ह म्हादई’ चळवळीचा भाग आहे. साखळीत सभा होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. साखळीत म्हादई वाळवंटी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे म्हादईवर जर संकट ओढवले तर वाळवंटीवरही ते येणार आहे. त्याचा फटका साखळीलाही बसणार आहे, हे लक्षात घ्यावे.
त्यासाठीच साखळीत सभा घेण्याचे निश्चित केले होते. परंतु ही सभा हाणून पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. तथापि, १६ रोजी विर्डी-आमोणा पुलाजवळ खासगी मैदानात ही सभा होईल. ‘सेव्ह म्हादई’ बॅनरखाली गोमंतकीयांनी एकत्रित यावे, असे विजय सरदेसाई म्हणाले.
राज्य सरकारने म्हादई कर्नाटक सरकारला विकली आहे. हा विषय न्यायालयात जावा, असे मनोमन वाटते म्हणून आम्ही गोमंतकीय एकत्रित आलो आहोत. म्हादई वाचविण्यासाठी जे लोक पुढे आले आहेत, त्यांच्या पाठीशी राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ज्यांना म्हादई वाचावी, असे वाटते त्या सर्व लोकांनी सोमवारच्या सभेसाठी बाहेर पडावे, असे आवाहन ॲड. पालेकर यांनी केले. गोमंतकीयांसाठी आता ‘जगा किंवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जर गप्प बसलो तर मरून जाऊ. त्यामुळे सर्व गोमंतकीयांनी एकत्रित यावे, असेही पालेकर म्हणाले.
काँग्रेसने म्हादई वाचवण्यासाठी यापूर्वीच जागृती सुरू केली आहे. म्हादई वाचविण्यासाठी जे लोक आंदोलन करतील, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असा ठराव काँग्रेसने यापूर्वीच घेतला आहे, याची आठवण करून देत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, म्हादईचे पाणी जर बंद झाले तर संपूर्ण गोव्यावर त्याचा परिणाम होईल. म्हादई वाचविण्यासाठी सर्व लोकांनी सभेला येणे आवश्यक आहे.