कास परिसरातील वन्य प्राण्यांचा परळी खोऱ्यात शिरकाव…
सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील कास पठाराला चारही बाजूंना घनदाट जंगल असून या परिसरात अनेक वन्य प्राणी पहायला मिळतात , परंतु कास पठाराला जेव्हा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले त्यानंतर इथल्या जैवविविधतेला धनदांडग्यांची नरजच लागली, आणि परिसरातील वन हद्दीजवळील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जमिनी खरेदी करत याठिकाणी असलेली झाड तोडून याठिकाणी भली मोठी अतिक्रमणे उभी करून सिमेंट चे जंगल उभे केले.
दरम्यान याठिकाणी बेकायदेशीर बांधकामे होत असताना देखील तलाठ्यापासून तहसीलदार आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांपासून जिल्हाधिकारी यांनी वेळीच लक्ष न दिल्याने कारवाई न केल्याने आज कास पठारावरील जंगल कमी झाल्याने जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा परळी खोऱ्यात वळविला .
खरंतर कास पठारचा परिसर हा जागतिक वारसा स्थळ असल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नाही , असे असताना देखील अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी झाली , त्यांवर अनेक तक्रारी झाल्या परंतु जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी योग्य कारवाई न केल्याने परिसरात सिमेंट चे जंगल उभे राहिले.
कास परिसरातील जंगली प्राण्यांना देखील याठिकाणी वाढलेल्या रहदारीचा त्रास होऊ लागल्याने या परिसरातील जंगली प्राण्यांनी देखील पठाराच्या खालच्या भागात म्हणजेच परळी खोऱ्यात शिरकाव केला , यामुळे आता परळी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेतीत हे जंगली प्राणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान करु लागल्याने परिसरातील शेती धोक्यात आली , यामुळे परिसरातील ग्रामस्थ यांनी सोमवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली वन विभागाच्या विरोधात आपल्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच वन विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा काढणार आहेत.