google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

अनैतिक संबंधात अडथळा; खून करून शेतात पुरला मृतदेह

कराड (अभयकुमार देशमुख) :

तालुक्यातील वहागाव येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आले आहे. खून झाल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर एका शेतात पुरलेला मृतदेह पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने उकरून बाहेर काढला.

या प्रकरणातील संशयित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बरकत खुद्दबुद्दीन पटेल (वय- 32, रा. वहागाव, ता. कराड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे‌.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 1 जून रोजी तळबीड पोलीस ठाण्यात बरकत पटेल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. दिनांक 28 मे पासून बरकत बेपत्ता असल्याचे म्हटले. सात दिवसापासून नातेवाईक बेपत्ता बरकत पटेल याचा शोध घेत होते. आज शुक्रवारी बरकत पटेल याची बहिण परवीन रमजान शेख हिने रोहित पवार यांच्या शेतातील ओघळ (ओढा) का मुजवली आहे, असा संशय व्यक्त केला. तसेच मुजवलेला ओढा उकरावा, अशी विनंती पोलिसांना केली होती. यानंतर तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणची माती जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा 8 वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 फूट मातीखाली बरकत याचा मृतदेह सापडला.

कराडचे डीवायएपी डॉ. रणजित पाटील, तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत शोध मोहीम राबवण्यात आली होती. बरकत पटेल यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच बहिण परवीन शेख यांच्यासह नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. या गुन्ह्यातील संशयित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन रात्री उशिरा करण्यासाठी नेण्यात आला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!