‘ही’ ठरली ‘बुकर’ मिळवणारी पहिली भारतीय कादंबरी
नवी दिल्ली:
लेखिका गीतांजली श्री यांच्या ‘टॉम्ब ऑफ सँड’ या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी हिंदीमध्ये ‘रेत समाधि’ या नावाने प्रकाशित झाली होती, त्याचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला आहे, ज्याचं नाव ‘टॉम्ब ऑफ सँड’ ठेवलं. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या जगातील 13 पुस्तकांपैकी हे पुस्तक होते. हिंदी भाषेतील ही पहिलीच कादंबरी आहे जी या प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांच्या यादीत होती.
‘टॉम्ब ऑफ सँड’ हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे कोणत्याही भारतीय भाषेतील पहिलं पुस्तक ठरलं आहे. गुरुवारी (26 मे) लंडनमधील एका कार्यक्रमात, लेखिका गीतांजली श्री यांना या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला. गीतांजली श्री यांना पाच हजार पौंडची रक्कम मिळाली जी त्या डेजी रॉकवेल यांच्यासोबत शेअर करणार आहेत.
1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पती गमावलेल्या 80 वर्षीय विधवा महिलेची कथा या कादंबरीत आहे. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये जाते. खूप संघर्षानंतर, तिने तिच्या नैराश्यावर मात केली आणि फाळणीच्या वेळी मागे राहिलेल्या भूतकाळाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेते. राजकमल प्रकाशनाने प्रकाशित केलेलं ‘रेत समाधि’ हे पहिले हिंदी पुस्तक आहे ज्याने केवळ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीमध्ये स्थान मिळवलं नाही तर तो पुरस्कारही जिंकला.
या पुरस्कारांसाठी निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलेले अनुवादक फ्रँक वाईने म्हणाले की, “अत्यंत उत्कट चर्चेनंतर न्यायाधीशांनी ‘टॉम्ब ऑफ सँड’ या पुस्तकाला बहुमताने मत दिलं. अत्यंत क्लेशकारक घटनांचा सामना करुनही ही एक विलक्षण पुस्तक आहे.”