Ram Mandir Inauguration: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. याआधी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता.
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिर (Ram mandir) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी देशभरातल्या अनेक मोठ्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही त्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर आता ममता बॅनर्जी या अयोध्येतील कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
माकपचे सीताराम येचुरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यावर प्रतिक्रिया देताना सीताराम येचुरी यांनी म्हटलं की, माकपचे धोरण धार्मिक श्रद्धांचा आदर करण्याचे आहे. धर्म ही वैयक्तिक निवड आहे ज्याचे राजकीय फायद्याचे साधन बनू नये. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा राज्य प्रायोजित कार्यक्रम आहे.
मंगळवारी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत राम मंदिर (Ram Mandir) ट्र्स्टकडून आलेल्या आमंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यानंतर पक्षाने ट्वीटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीपीएमने म्हटले की, धार्मिक श्रद्धेचा आदर करणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या श्रद्धेचे पालन करण्याचा अधिकार हे आमचे धोरण आहे. धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे, ज्याचे राजकीय फायद्याचे साधन बनू नये. निमंत्रण मिळूनही कॉम्रेड सीताराम येचुरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. कॉम्रेड येचुरी यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी मंदिराचा भव्य अभिषेक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पीएम मोदी 30 डिसेंबरला अयोध्येला भेट देणार असून अयोध्या रेल्वे स्टेशन आणि नवीन विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राजकारणी आणि अभिनेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.