‘पोस्टमन’ विषयावर आप आमदार भेटणार मुख्यमंत्र्यांना…
फोंडा :
येथील टपाल कार्यालयातून तडकाफडकी कामावरून काढलेल्या फोंडा पोस्टमनच्या शिष्टमंडळाने सोमवारी आमी आदमी पक्षाच्या आमदारांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यानंतर आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस आणि इंजिनियर क्रुझ सिल्वा यांनी त्यांचे समर्थन दर्शविले. तसेच त्यांची समस्या मांडण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटण्याचे आश्वासन आपच्या आमदारांनी दिले.
वेळळी तील आपचे आमदार इंजिनियर क्रुझ सिल्वा म्हणाले, “कामावरून अचानक बडतर्फ केलेले सदर पोस्टमन हे कुटुंबातील एकमेव कमावते आहेत. ते गेल्या १८ वर्षांपासून पोस्टमन म्हणून काम करत होते. त्यांना अचानक कामावरून काढून टाकणे, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे”.
बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस म्हणाले, “टपाल सेवेत गोवा हा महाराष्ट्राचाच एक भाग आहे. मात्र, याचा अर्थ असा मुळीच नाही, की महाराष्ट्रातील लोकांना सर्व रोजगार संधी दिल्या जाव्यात आणि गोव्याकडे दुर्लक्ष केले जावे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करून पोस्टमनची, समस्या ऐकण्यासाठी वेळ काढण्याची विनंती केली आहे”.
‘आप’चे उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे यांनी हा विषय सर्वप्रथम समोर आणला होता. तिळवे यांनी गेल्या आठवड्यात, उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याच्या खासदारांची भेट घेऊन हा विषय खासदारांनी गांभिर्याने घ्यावे अशी मागणी त्यांनी केली होती.