‘त्या’ उपनिरीक्षकांना निलंबन करण्याची आपकडून मागणी…
कोलवा पोलिस स्थानकात आपली तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला उपनिरिक्षक विबिन राव शिरोडकर यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी मंगळवारी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची भेट घेऊन उपनिरिक्षक शिरोडकर यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, कॅप्टन व्हिएगस यांच्यासोबत आलेल्या महिलेने कोलवा उपनिरिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. व्हिएगस म्हणाले, “उपनिरीक्षक शिरोडकर यांनी महिलेला बेदम मारहाण केली आणि तिला तिच्या पतीला वाचवायचे असेल तर बूट चाटण्यास सांगितले. घटना काहीही असो त्यावर मी वाद घालत नाही. मला फक्त चिंता आहे की एक पुरुष पोलीस अधिकारी महिलेशी असे कसे वागू शकतो? त्याला अधिकार कोणी दिला? पिंक फोर्स कुठे आहे, की ते फक्त शोपीस आहेत?”
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी कॅप्टन व्हिएगस यांनी मांडलेला मुद्दा बरोबर असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.
महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि अन्याय रोखण्यासाठी आप पक्ष सदैव तत्पर आहे. याही घटनेचे आम्ही निरीक्षण करत राहणार. शिवाय पोलिसकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीविरूद्ध सदैव आवाज उठवला जाईल.