”त्या’ आदेशाने कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतितील बेकायदेशीर बाबी पुन्हा उघड’
मडगाव :
माझी 20 ऑक्टोबर 2023 रोजीची तक्रार आणि 20 नोव्हेंबर 2023 रोजी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, सासष्टीचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी अखेर 21 नोव्हेंबर 2023 रोजी ग्लोबल इस्पात लिमिटेड यांनी कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतितील सर्वे क्रमांक 303/3 उभारलेली शेड व बांधकाम काढून टाकण्याचा आणि सदर जमीन त्याच्या मूळ स्थितीत आणण्याचा आदेश जारी केला. सदर आदेशाने पुन्हा एकदा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीरपणा ऐरणीवर आणला आहे, असे कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
उपजिल्हाधिकारी आणि एसडीओ-II यांनी दिनांक 21/11/2023 रोजी जारी केलेल्या आदेश क्रमांक LRC/Illegal-Conv/37/2023/2626 वर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीतील प्रदूषण तसेच बेकायदेशीर कारभार कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
कुंकळ्ळीत कार्यरत असलेल्या ग्लोबल इस्पात लिमिटेडने सर्वे क्रमांक 303/3 मधील शेतजमिनीचा वापर बिगरकृषी कारणासाठी केला आहे आणि जमीन महसूल कायदा 1968च्या कलम 32 नुसार जमिनीच्या रूपांतरणासाठी कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. सदर जमिनीवर पडलेली सामग्री काढून टाकण्यासाठी प्राधिकरणांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यातही ते अयशस्वी ठरले. यावरून ग्लोबल इस्पात लिमिटेडचा सरकारी आदेशाचे पालन न करण्याची बेशिस्त व अहंकार दिसून येतो, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील वायू, जल प्रदूषण आणि बेकायदेशीरता यामुळे आरोग्याला होणारा धोका व राज्याच्या महसुलाचे होणारे नुकसान हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. गोवा विधानसभेच्या मागिल पाचही अधिवेशनांमध्ये मी हा मुद्दा सातत्याने मांडला होता. सरकारी अधिकार्यांनी आता उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे हि चांगली गोष्ट आहे असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
मी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (GSPCB) कुंकळ्ळीतील प्रदूषणाचा मुद्दाही उचलला आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विविध घटकांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आतातरी कठोर उपाययोजना केल्या जातील अशी मी आशा बाळगतो. गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील औद्योगीक आस्थापनांवर चोवीस तास लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
मागच्या विधानसभा अधिवेशनात मी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रदूषण, बेकायदेशीरता, अनियमितता आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधण्यासाठी नोडल एजन्सी स्थापन करण्याची मागणी केली होती. मला आशा आहे की सरकार लवकरच त्यावर निर्णय घेवून आदेश जारी करेल. सरकारने परत चालढकल केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.