‘मानवी भावनांची सार्वत्रिकता अद्भुत आहे’
54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल ब्रिटीश चित्रपट निर्माते स्टुअर्ट गट्ट यांच्या कॅचिंग डस्ट चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रीमियरने प्रारंभ झाला.
मानवी भावनांवर चित्रपटाचा असलेला भर याबाबत अधिक माहिती देताना चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितले की, मानवी भावनांचे सार्वत्रिकता अद्भुत असून टेक्सासमधील एका कथेला सर्वत्र सारखाच प्रतिसाद मिळत आहे . दिग्दर्शक स्टुअर्ट गट्ट यांच्यासह सह-निर्माते मार्क डेव्हिड आणि जोनाथन कॅट्झ आज गोव्यातील 54 व्या इफ्फीमध्ये पत्र सूचना कार्यालयाने प्रतिनिधी, माध्यमे आणि चित्रपट रसिकांबरोबर आयोजित केलेल्या संवादात बोलत होते.
कॅचिंग डस्ट हा चित्रपट अमेरिका, ब्रिटन आणि स्पेनची सह-निर्मिती आहे . स्टुअर्ट गॅट यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्यांनी सामाजिक विषयांवर अनेक लघुपट बनवले आहेत. लघुपटांकडून चित्रपटाकडे वळण्याच्या प्रवासाबद्दल स्टुअर्ट म्हणाले, “यासाठी खूप बारकाईने लक्ष द्यावे लागले आणि याचा कालावधी देखील खूप मोठा आहे. त्यामुळे अथक काम करावे लागले .”
पदार्पणाच्या चित्रपटासाठी भडक विषय निवडण्याबद्दल विचारले असता, स्टुअर्ट म्हणाले की त्यांना मानवी मनोविज्ञानाच्या गडद पैलूंचा शोध घ्यायचा होता. “अमेरिकन चित्रपट सकारात्मक भावनांवर अधिक लक्ष केंद्रित करतात मात्र माणूस म्हणून आपण संघर्ष करतो आणि वेगवेगळ्या भावनांमधून जातो. विषय निवडण्यात कदाचित माझ्या बालपणाचाही थोडा वाटा असेल. ”
चित्रपटाच्या उत्पत्तीबद्दल बोलताना, स्टुअर्ट यांनी त्यांचा दृष्टिकोन, त्याचे दिवास्वप्न आणि काही कल्पनांमध्ये तो कसा अडकला आणि नंतर त्या कल्पना कशा साकारत गेल्या याची माहिती दिली.
चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेले मार्क डेव्हिड म्हणले की त्यांना पात्रे आवडली. ती कथेत कशी विकसित होत गेली आणि स्टुअर्ट यांच्याबरोबर यापूर्वी लघुपट केल्यामुळे चांगले संबंध होते. दुसरे सह -निर्माते जोनाथन कॅट्झ म्हणाले, “जेव्हा मी पटकथा वाचली, तेव्हा मला त्यातील व्यक्तिरेखा आणि संवाद आवडले, चित्रपट तयार होताना दिसला “.
मार्क डेव्हिडला कॅनरी आयलंड्समधे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आलेल्या आव्हानांबद्दल विचारले असता, त्यांनी वादळ, धुळीने भरलेले आजूबाजूचे वातावरण आणि 35 मिमी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सामोऱ्या आलेल्या अनेक आव्हानांचा उल्लेख केला. प्रक्रिया करण्यासाठी आणि चित्रित तुकडे पाहण्यासाठी त्यांना ते लंडनला कुरियर करावे लागत असे हेच मुळात वाहतुकीच्या दृष्टीने एक मोठे आव्हान होते.
उद्घाटनपर सत्रासाठी चित्रपटाची निवड झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त,करताना स्टुअर्ट म्हणाले की हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. त्यांनी त्यांच्या मुळांविषयी सविस्तरपणे सांगितले; त्यांची आई भारतीय, वडील एक स्थलांतरित इटालियन आणि ते स्वतः युनायटेड किंग्डम मध्ये खडतर जीवन जगले. तो यूके तील आशियाई स्थलांतरीतांचा एक मोठा विभाग होता आणि वसाहतवादाचा परिणाम झालेला भाग होता. ते पुढे म्हणाले, “कला हा आपल्या सामान्य जगण्यातला एक प्रमुख अनुभव आहे. मी स्वतःला एक स्थलांतरित म्हणून ओळखतो आणि मला माझ्या आशियाई समुदायात अधिक सुखकर वाटते.” त्यांच्या भारतीय मुळांबद्दल सांगताना त्यांनी विनोदाने भारतीय चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.