‘मनोहर पर्रीकर काणकोण बगल रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा’
पणजी :
काणकोण येथील मनोहर पर्रीकर बगल रस्त्यावर झालेल्या जीवघेण्या अपघाताबाबत राज्य सरकार आणि कंत्राटदराव जोरदार टीका करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी एमव्हीआरआयपीपीएलचा परवाना निलंबित करून निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जनार्दन भंडारी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
“काणकोण काँग्रेस परिवार आणि जनसेना वॉरियर्स यांनी जानेवारी 2016 पासून काणकोण बगल रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या विरोधात आवाज उठविला आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा विविध प्राधिकरणांकडे करत आहेत, परंतू कोणीही आमच्या वादाची दखल घेण्याची तसदी घेतली नाही,” असे भंडारी म्हणाले.
ते म्हणाले की, मनोहर पर्रीकर काणकोण बगल रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे व उपाययोजना न केल्यामुळे या रस्त्यावर अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. “राजबाग, काणकोण आणि तोरशें -पत्रादेवी येथे अलीकडे झालेले अपघात, ज्यात पुण्यातील कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाला, त्यावरून कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाचे प्रकार उघड झाले आहेत. यासाठी सरकारने या कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे.
पत्रादेवी ते बांबोळी आणि काणकोण चार रस्ता ते माशे पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात गुंतलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,” असे भंडारी म्हणाले. मनोहर पर्रीकर काणकोण बगल रस्त्याच्या निकृष्ट कामासाठी एमव्हीआरआयपीपीएल या कंत्राटदाराचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात यावा. या कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत आणि रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याच्या गुणवत्तेचीही चौकशी करण्यात यावी,” असे ते म्हणाले.
या प्रकल्पाची अंदाजे किंमत 190 कोटींवरून 290 कोटींपर्यंत वाढली, त्यामुळे कामाला विलंब का झाला आणि प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याची चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले. “मनोहर पर्रीकर बगल रस्त्याच्या कामाशी संबंधित विविध सल्लागार कंपन्या आणि सल्लागारांना बगल रस्त्याचा दर्जा योग्य राखण्यासाठी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याबद्दल काळ्या यादीत टाकण्यात यावे. मनोहर पर्रीकर बगल रस्त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांवर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि या सरकारी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी भंडारी यांनी केली.
भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, रोड-कार्पेटवर, विशेषतः वळणांवर रस्ता सुरक्षा अभियांत्रिकी उपायांचे पालन केले जात नाही, ज्यामुळे बिनधास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांना त्यांच्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.