‘मुख्यमत्र्यांच्या ‘त्या’ ट्रस्ट स्थापन करण्याच्या प्रस्तावावर गोमंतकीयांचा ‘ट्रस्ट’ नाही’
मडगाव :
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खाजगी वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी ट्रस्ट बनवण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रस्तावावर गोमतकीयांचा ट्रस्ट अर्थात विश्वास नाही. या ट्रस्टमध्ये अदानी, अंबानी,जिएमआर आणि इतर क्रोनी कॅपिटलिस्ट विश्वस्त म्हणून असू शकतात. भाजप सरकारने आयसीयू, कॅथलॅब, न्यूरो सर्जरी युनिटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञांसह सर्व मंजूर कर्मचारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्वरित नियूक्त करावेत. आम्ही खाजगीकरणाला विरोध करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोव्यातील हॉस्पिसिओ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याच्या नुकत्याच केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी सर्व काही क्रोनी कॅपिटलिस्टच्या हाती सोपवण्याचे धोरण अवलंबवील्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हा गोमंतकीयांना स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी काँग्रेस सरकारचा दूरदर्शी प्रकल्प होता. रुग्णालयाच्या खाजगीकरणाच्या कोणत्याही प्रस्तावा विरूद्ध आम्ही एकत्रितपणे लढा देऊ आणि विरोध करू, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डॉक्टरांची 28 रिक्त पदे भरायची आहेत. या रिक्त पदांमध्ये 1 वरिष्ठ बालरोगतज्ञ, 2 वरिष्ठ शल्यचिकित्सक, 1 वरिष्ठ ईएनटी सर्जन, एक वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, एक वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, 2 वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, 2 मेडिको कायदेशीर अधिकारी, 3 कनिष्ठ भूलतज्ज्ञ आणि 3 वैद्यकीय अधिकारी आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
सरकारने अजून आवश्यक असलेली कार्डियाक कॅथ लॅब सुरू केलेली नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्डिओलॉजिस्ट आठवड्यातून एकदाच मडगावला येवून कार्डिओलॉजी ओपीडी सेवा सुरू देत आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
न्यूरो सर्जरी युनिट कधी सुरू होईल, हे कोणालाच माहीत नाही. सरकार वर्षानुवर्षे केवळ आश्वासने देत आहे. त्यांच्याकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत परंतु आरोग्य सेवेसाठी निधीची कमतरता आहे असे युरी आलेमाव म्हणाले.
नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट), आयटीयू (इंटेन्सिव्ह ट्रॉमा युनिट), सीसीयू (क्रिटिकल केअर युनिट), प्लास्टिक सर्जरी आणि एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग), ऑन्कोलॉजी यासारख्या सुपर स्पेशालिटी सेवा अजुनही दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत , युरी आलेमाव म्हणाले.
माझ्याकडे असलेल्या माहिती प्रमाणे 642 मंजूर पदांपैकी 494 पदे भरलेली आहेत त्यापैकी 159 कंत्राटी आधारावर आहेत आणि 155 अजूनही रिक्त आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे रेफरल हॉस्पिटल बनले आहे. जवळजवळ प्रत्येक रुग्णाला जीएमसी किंवा खाजगी हॉस्पिटलात पाठवीले जाते, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.