‘अमित शहांचे विधान चुकीचे सिद्ध करण्याची हिंमत भाजपने दाखवावी’
पणजी :
म्हादई नदीच्या प्रश्नावर राज्य सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, हे कर्नाटकातील प्रसार माध्यमांनाही सांगण्याची हिंमत आमच्यात आहे, असे सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आधी अमित शहांचे विधान चुकीचे सिद्ध करण्याची हिंमत दाखवावी असे काँग्रेसने म्हटले आहे.
तानावडे यांनी नुकतेच म्हटले होते की, “कर्नाटकातील प्रसार माध्यमांनी आम्हाला म्हादईच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला तरी आम्ही या मुद्द्यावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे विधान करू, आमच्यात तशी हिंमत आहे,‘‘
“खरे तर हे धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात प्रचारात दाखवायला हवे होते. हे धाडस दाखवण्याऐवजी सावंत यांनी कन्नडमध्ये भाषण केले आणि म्हणाले की ‘स्वल्प स्वल्प कन्नड माथादेने’ (मी कन्नडमध्ये थोडे बोलू शकतो). आपल्या पक्षाला मते मिळवून देण्यासाठी त्यांनी हे केले,” असे काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यानी म्हटले आहे.
पणजीकर म्हणाले की, प्रमोद सावंत यांच्या कृतीतून असे दिसत आहे की ते म्हादईच्या मुद्द्यावर कर्नाटकचे समर्थन करत आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान केले होते ते खरे होते.
जानेवारीमध्ये, बेळगावी येथे एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते: “आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की केंद्रातील भाजपने गोवा आणि कर्नाटकमधील म्हादईचा दीर्घकाळचा वाद सोडवला आहे आणि म्हादईला वळवण्याची परवानगी दिली आहे. कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची तहान भागवणार आहे.’’
अमित शहा गोव्यात जाहीर सभेत बोलतील तेव्हा प्रमोद सावंत आणि भाजपच्या इतर नेत्यांना आता या विषयावर स्पष्टीकरण देण्याची चांगली संधी मिळाली आहे. कर्नाटकात प्रसारमाध्यमांसमोर बोलणे विसराच, भाजपच्या नेत्यांनी अमित शहा यांच्यासमोर गोव्यातच हे विधान करून दाखवायची हिंमत दाखवावी आणि ते जे काही बोलले ते चूक होते हे स्पष्ट करायला हवे,” असे पणजीकर म्हणाले.
‘‘अमित शाह ज्या दिवशी गोव्यात जाहीर सभेला संबोधित करतील त्या दिवशी, आणि गोव्यातील भाजप नेत्यांच्या कर्नाटकातील प्रचारादरम्यान तुमची हिंमत पाहण्यासाठी गोवा उत्सुक आहे. जर ते तसे करू शकले नाहीत तर राज्यातील लोक त्यांना ‘मास्टर्स ऑफ यू-टर्न’ म्हणतील,” असे पणजीकर म्हणाले.