‘युवक काँग्रेस ठेवणार सरकारवर करडी नजर’
पणजी :
गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी तरुणांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविण्याची कामगिरी चोख बजावली आहे. युवक काँग्रेसने कोविड महामारीच्या काळात गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. मला विश्वास आहे की युवक काँग्रेस भाजप सरकारवर करडी नजर ठेवेल आणि सरकारची लोकविरोधी धोरणे आणि घोटाळे उघडकीस आणेल, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
पणजी येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित गोवा प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसच्या सचिव आणि गोवा प्रभारी श्रीमती रिची भार्गव आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर आणि इतर पदाधिकारी हजर होते.
“युवा जोडो बूथ जोडो” मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नक्कीच कठोर परिश्रम करू. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात युवतींचा सहभाग सुनिश्चित करणे आणि संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची गरज असल्याचे ॲड. वरद म्हार्दोळकर यानी यावेळी बोलताना सांगितले.
आगामी पंचायत निवडणुकांत अधिकाधीक युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आले.
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या सचिव व गोवा प्रभारी रिची भार्गव यांनी युवक काँग्रेसच्या सदस्यांना संबोधित करताना त्यांना बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी आणि गोव्यातील युवकांशी संबंधित समस्या हाताळण्याचे आवाहन केले.
या बैठकीला राज्यभरातील शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून चर्चेत भाग घेतला.