google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

निमित्त ‘भिजकी वही’, खेप चौथी…

मंगळवार २० डिसेंबर २०२२ रोजी मुंबईत गोरगाव इथं केशव गोरे स्मारक ट्रस्ट मध्ये अरुण कोलटकर  (Arun Koltkar) यांच्या “भिजकी वही” या कविता संग्रहाच्या चौथ्या आवृत्तीच प्रकाशन डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी रेखा शहाणे यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा हा संपादित अंश…

 

एक सुखद संध्याकाळ आहे. करोना काळाची सावली आसपास फिरत असली तरी २०२२ सालाने सुरुवातीपासूनच आपल्याला थोडीएक मोकळीक दिली. ठप्प झालेली कामं जरा नीट मार्गी लागायला लागली. प्रास प्रकाशनही त्याला अपवाद नाही. सहज बोलतांना अशोक शहाणे म्हणाले, एक नोव्हेंबर आलाच की गं! म्हणजे अरुण (Arun Koltkar) नव्वदीचा झाला असता. यावर “भिजकी वही” काढायचं ठरलं. मुद्रा प्रिंटींग प्रेस बंद होऊन दोन वर्ष झाली होती. अशोकनी सुजितदादाला फोन लावला. हा, बोल अरे, “भिजकी वही”च्या चौथ्या आवृत्तीला जायचं म्हणतोय. हा, ठीक आहे. तो आमोद तुला फोन करेल. बाकी मी आहे. घालतो लक्ष. बास! पुस्तक निघतंय हे एव्हढ्या चार वाक्यात ठरून गेलं. आणि कामही सुरू झालं.

सुजितदादाचे आणि अशोकचे एरवीही सहज फोन व्हायचे. “बरेच दिवसात गाठ नाही रे मुंबईला कधी येतोयस” “हा, येतो. कळवतो तुला” म्हणजे सगळं तर आलबेलच होतं. काही ध्यानीमनीच नाही. आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी साडेसातला आमोदचा फोन आला. रेखाताई, माझे सुजित सर आणि काकांचे मित्र आज सकाळी ५.३० वाजता आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. अशोकना हा एक जबरदस्त धक्का होता. आज “भिजकी वही”च्या चौथ्या खेपेचं प्रकाशन करण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. पण प्रास प्रकाशन आणि अशोक शहाणे यांच्यासाठी ही संध्याकाळ जितकी सुखद आहे त्या पेक्षा कैक पटीनी दुख:द आहे. सुजित पटवर्धनांचा वारसा मिळालेले आमोद भोईटे आपल्याबरोबर आहेत. पण आदरणीय सुजित पटवर्धन आपल्या बरोबर नाहीत. ही उणीव कधीच भरून निघणारी नाही. काळ आणीबाणीचा होता. आणि आपल्याला हवं ते कोणी छापू शकत नाही, ते लोकांपर्यंत आपण पोहचवू शकत नाही, तर आपलं स्वतःचं प्रकाशन असायला हवं असं अशोकना आणि त्यांच्या मित्रांना वाटायला लागलं. झालं, प्रकाशनाच्या नावासकट अशोक शहाण्यांच्या डोक्यात प्लॅन पक्का झाला. आणि रघु दंडवते-बाळ ठाकूरनी उचलून धरला. १९७७ साली दणक्यात ‘प्रास प्रकाशना’चं पहिलं पुस्तक निघालं – ‘अरुण कोलटकरच्या कविता’.

कॉपी प्रेसला देणार तर अरुणनी एक कविता अशोककडे आणून दिली. अशोकनी त्याच्याकडे पाहिलं. म्हणाले, ‘हां, आता ही शेवटची’. कविता आणीबाणीबद्दल होती. पुस्तकांत आहे ती- ‘काळा रुमाल’. ती संगम प्रेस होती. प्रकाशन सुरू झालं आणि अशोक शहाणे, प्रास प्रकाशन, सुजित पटवर्धन आणि ‘मुद्रा प्रिंटिंग प्रेस’चं एक अतूट नात तयार झालं. यावेळी आदरणीय सुजित पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन आपण केलंय. आणि आता ती आवृत्ती तुमच्या समोर असणार आहे.

प्रासच्या कोणत्याही पुस्तकाकडे ग्राहकाच्या नजरेनं आपण पाहिलं, तर कविता वाचकांच्या डोळ्यांसमोर सबंध येईल अशी तिची मांडणी पुस्तकात जाणीवपूर्वक केल्याचं सहज दिसून येतं. म्हणजे दोन पानी कविता असेल, तर ती डाव्या पानावरच सुरू होते आणि निव्वळ एका दृष्टीक्षेपात संबंध कविता वाचकाला डोळ्यासमोर दिसते. मग काय होतं की, गरजेप्रमाणे कवितेवर पुन्हा एकदा नजर सहज फिरवता येते. आणि वाचक कवितेशी स्वतःला जोडून घेतो. मांडणीचं हे विलक्षण भान प्रासच्या कवितेच्या प्रत्येक पुस्तकांत दिसतं. आणि प्रत्येक पुस्तकात ही वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणखी कोणाची नाही, तर प्रासचे सर्वेसर्वा अशोक शहाणे यांचीच असते. शिवाय संग्रहाला अर्थपूर्ण आकार देणारा कवितांचा क्रमही शहाणे यांनीच लावलेला असतो. अगदी अरुण कोलटकरच्या कोणत्याही पुस्तकातसुद्धा.

एक गंमत आहे. मी आता प्रास प्रकाशनाचा एक भाग आहे. पण प्रास प्रकाशन, अशोक शहाणे यांच्याबद्दल बोलताना माझ्या मनावर कोणतंही, कसलंही तसं दडपण, अवघडलेपण नाही आणि यात आत्मस्तुतीचा धोका आहे, असंही मला वाटत नाही. कारण मी विशी-पंचविशीत असताना ही पिढी चाळीशी, पंचेचाळीशी, पन्नाशीच्या आतबाहेर होती. यांच्या संपर्कात मी तशी फार उशीरा आले. म्हणूनच या पिढीच्या वाङ्यीन कारकिर्दीकडे मी तटस्थपणे सहज पाहू शकते, हा विश्वास मला आहे. प्रासबद्दल बोलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, प्रासच्या पुस्तकांच्या मागे ज्यांची नजर आहे, दृष्टी आहे ते अशोक शहाणे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. एका बाजूनं ते लेखक, समीक्षक, संपादक, भाषांतरकार आहेत. आणि प्रिंटिंगमधलं त्यांचं कसब प्रत्येक पुस्तकाबरोबर वेगळ्या अंगानं अधिक खुललेलं दिसतं. या सगळ्या गोष्टी एका माणसाच्या अंगी असतील तर पुस्तक कसं निघतं, हे आपल्याला प्रासच्या पुस्तकामध्ये पाहता येतं.

प्रासच्या पुस्तकांचे आकार हा एक स्वतंत्र विषयच आहे. पण थोडक्यात म्हणायचं तर प्रासच्या पुस्तकाचे आकार ‘प्रास’ ठरवत नाही, तर पुस्तकातला मजकूर त्याचा आकार ठरवते. म्हणून त्या मध्ये एवढी विविधता दिसते. मुळात प्रास हा हौसेचा मामला आहे. प्रासची पुस्तक छापणं हे प्रेसला एक आव्हान असतं. अगदी मुखपृष्ठाचं डिझाईन तयार झालं की, त्यातले रंग कमी-जास्त होत नाहीत. तो डिझाईनचा भाग आहे. ‘कसा छापायचं ते तुम्ही पहा’, असं म्हणताना शहाणेंना माहीत असतं की, प्रेसला ते करता येईल, यायला हवं. प्रेसवर पडणारं हे काम इतर कामांपेक्षा खूप वेगळं असतं. सुजित पटवर्धन म्हणायचे, ‘नीट लक्षात आलंय तुमच्या? हे अशोक शहाण्यांचं काम आहे. ते येतात म्हणजे ते प्रेसच ऑडिट करतात.’ माझे कामगार शिकतात. आणि म्हणूनच फोर कलरचं कव्हर छापताना जे काही करायला पडतं, त्याचे पैसे त्यांनी कधीही प्रासला लावले नाहीत.

arun koltkar

पण आता समजा अरुण कोलटकरांनी मुखपृष्ठाचे पैसे लावले असते, अशोकनी ले-आउटचे आणि सुजीतदादानी प्रिंटिंगचे सगळे पैसे लावले असते, तर ते पुस्तक किती जणांना परवडलं असतं? म्हणूनच मी जाणीवपूर्वक म्हणते प्रास हा हौसेचा मामला आहे. या सगळ्यांचाही हात त्याला लागलेला आहे.
आता प्रासचे कवी, लेखक, समीक्षक, कादंबरीकार, नाटककार यांच्यावर नजर टाकली, तर लक्षात येतं की, ही नावं इतकी ठसठशीत आहेत की,
त्यांची नावं घेतल्याशिवाय मराठी वाङ्मयाचा अभ्यास पुरा होणार नाही. सबंध अरुण कोलटकर म्हणजे त्यांच्या इंग्रजी-मराठी दोन्ही कविता, ‘द पोलीसमन’सारखं रेखाचित्रांचं पुस्तक, या सर्वांवर प्रासची मुद्रा आहे. आणि अरुण कोलटकर हा प्रास लेखक आहे, हे जगप्रसिध्द आहे.
त्याशिवाय पहा ना, प्रासचे सगळेच लेखक कवी, हे बिनीचे कवी-लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे जे आज आपल्याबरोबर आहेत, दिलीप चित्रे, विलास सारंग, मनोहर ओक, नामदेव ढसाळ, वसंत दत्तात्रेय गुर्जर, सतीश काळसेकर, रघू दंडवते, वृंदावन दंडवते आणि स्वतः अशोक शहाणे, ही एवढी नावंही पुरेशी बोलकी आहेत.

आता यामध्ये भाऊ पाध्ये आणि चिं.त्र्य. खानोलकर याची नावं वेगळ्या अंगानं जोडूया. ते प्रासचे लेखक नाहीत. पण १९६१ मध्ये ‘रहस्यरंजन’ हातात घेतल्यावर ‘वासुनाक्या’मधल्या कथा सर्वांत आधी ‘रहस्यरंजन’मध्ये प्रसिद्ध झाल्या. आणि खानोलकरांची ‘झाडे नग्न झाली’ ही कादंबरी प्रथम दिवाळी ‘रहस्यरंजन’मध्ये प्रसिद्ध झाली. मग मौजेने ते पुस्तक म्हणून ‘रात्र काळी घागर काळी’ या नावानं छापलं. इकडे शहाणेंच्या कामावर कामावर खूष होऊन ना. वि. काकातरांनी ‘अथर्व’ हे लघु-अनियतकालिक बक्षीस म्हणून दिलं. ‘असो’ ‘आत्ता’ ही नंतर निघाली. त्यामधूनही अनेक नवे हात लिहिते झाले. रघू दंडवते यांची ‘मावशी’ ही कथा ‘अथर्व’मधलीच. लहान मुलांसाठीचं ‘गंमतजंमत’ दुर्गा भागवत पहायच्या. या मासिकासाठी अरुण कोलटकर, राजा ढाले यांनी लहान मुलांसाठी कविताही लिहिल्या.

एका बाजूला हे सगळं चालू होतं, पण अशोक शहाण्यांची नजर फक्त मराठीतल्या लिहित्या नवीन हातांकडेच होती असं नाही, तर त्यांची तीच नजर बंगालकडे नव्याने लिहिणाऱ्या सळसळत्या उत्साही हातांकडे- म्हणजेच ‘यंग हंग्री जनरेशन’कडेही होती आणि तिकडे अमेरिकेतल्या बीट जनरेशनच्या ॲलन गिन्सबर्गवरही होती. पण ती फक्त नजरच होती असं नाही, तर ही सगळी लेखक मंडळी त्यांनी मराठीत आणून उभी दाखल केली.
‘वेटिंग फॉर गोदो’, ‘कोंडी’, ‘डाक घर’सारखी नाटकही शहाणेंनी भाषांतरित केली. आणि ॲलन गिन्सबर्गची ‘सप्टेंबर ऑन जसोर रोड’सारखी इंग्रजी कविता पोस्टर पोएट्री म्हणून जगभरात सर्वांत प्रथम मुंबईत-महाराष्ट्रात प्रकाशित झाली. त्याचं श्रेय अशोक शहाणे यांच्याकडे जातं, असं स्वतः ॲलन गिन्सबर्गसुद्धा नमूद करतात.

आता १९५७-५८ पासून बंगालमधल्या ‘यंग हंगरी जनरेशन’चं लेखन भाषांतरित करून शहाणे यांनी मराठी वाङ्मयात एक नव वेगळं दालनच उभं केलं. आणि त्यामध्ये आधीचे अगदी ताराशंकर बंदोपाध्याय, शंभू मित्र, गौरकिशोर घोष, शंकर यांची ‘जनअरण्य’ आणि ‘सीमाबद्ध’ सुनील गंगोपाध्याय, मोती नंदी, शीरशेंदू मुखोपाध्याय, शक्ती चट्टोपाध्याय,विमल कर, महाश्वेतादेवींपासून अगदी तशी अलीकडची तस्लीमा नसरीनपर्यंतचे जुने-नवे सगळे लेखक त्यांनी मराठीत आणून दाखल केले आणि अमिताभ बच्चन यांचं चरित्रसुद्धा… अर्थात ही यादी वाढवता येईल… तर त्यामुळे मराठी भाषाही अधिक समृद्ध झाली असं आपण म्हणूया. तर ते असो.पण एकूणातच अशोक शहाणे यांच मराठी, मराठी भाषा, तिचा वापर आणि त्याबद्दल असलेली सजग दृष्टी, आच आणि भान यावरती बोलायचं झालं, तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. शिवाय संगणकावर मराठी हा एक आणखी स्वतंत्र भाग आहे. त्यावरही शहाणे यांनी स्वतंत्र विचार केलेला आहे. हे सगळं देशापरदेशातलं शहाणेंच्या पाठीशी होतं. मग प्रासच्या लिहित्या हातांची सूची वैविध्यपूर्ण का असणार नाही? तर असो.

ही झाली प्रास प्रकाशन आणि त्यांच्या मागे असलेल्या अशोक शहाणे यांची धावती ओळख. तरी मराठी साहित्यावरील ‘क्ष किरण’ आणि नेमाडेंची कोसला हा भाग राहूनच गेलाय. आणि आता ‘भिजकी वही’. या कवितासंग्रहाला २००४ मध्ये वि. पु. भागवत पुरस्कार’ देण्यात आला. मौजेचे भागवत म्हणत असत – ‘असला वेडेपणा अशोक शहाणेच करू जाणोत’. पण कशाचं तरी वेड असल्याशिवाय मोठाली कामं होत नाहीत, ही गोष्ट तितकीच खरी आहे. तर प्रासच्या प्रत्येक पुस्तकाचं काही एक वैशिष्ट्य असतंच.

आता ‘भिजकी वही’चं मुखपृष्ठ पाहूया. तर मुखपृष्ठावर कुठलंही चित्र दिसत नाही. पुस्तकाचं नावसुद्धा जरा बारकाईनंच बघावं लागतं. गर्द काळ्या रंगाबरोबर हलकीशी एक निळसर झाक आहे. आणि अगदी बारक्या अक्षरांमध्ये करड्या रंगात पुस्तकाचं नाव आणि कवीचं नाव दिसतं. मधला स्ट्रोक स्वच्छ पांढरा आहे. काळ्या रंगावर एक लहानगा करडा उजवा हात आहे आणि तसाच मलपृष्ठावर डावा हात. आणि पुस्तकाच्या स्पाईनवर एक लहान नागवी मुलगी दिसते. या मुलीचं नाव आहे- कम…

‘व्हिएतनाम वॉर’च्या बॉम्बस्फोटामध्ये ही लहानगी सापडलेली आहे. तिच्या अंगावर एक चिंधीसुद्धा उरलेली नाहीये. आणि बेभान, हताश होत ही मुलगी रस्त्यावर अनवाणी पायानं धावतेय आणि तिच्या पाठीमागे अशाच अनेक लोकांचा लोंढा धावतोय.
निक युट या फोटोग्राफरचं हे जगप्रसिद्ध छायाचित्र. त्याचा वापर करताना ‘स्पाईन अॅज कव्हर’ असा एक देखणा प्रयोग बहुदा जगभरामध्ये पहिल्यांदाच अशोक शहाणे यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. दर्शनीच ही त्यांची एक खासीयत आपल्या लक्षात येते.

तुम्ही पुस्तक हातात घेता. उघडता. प्रत्येक पान पाहता. हलकेच तुमच्या लक्षात येतं की, प्रत्येक पानावर आपली नजर फिरतेय. पहिल्याच पानावर एक डोळ्याचे चित्र दिसतं. इजिप्तिशिअन संस्कृतीमधलं हे चिन्ह ‘अश्रू’ या अर्थानं वापरलं जातं. पुढच्या पानावर संग्रहाचं नाव आहे. नंतर अर्पणपत्रिका आहे.
इथं एक गोष्ट मला मुद्दामहून नमूद केली पाहिजे की, अरुण कोलटकरांच्या (Arun Koltkar) कोणत्याही पुस्तकावर अर्पणपत्रिका नाही. मात्र ‘भिजकी वही’ हा संग्रह त्याला अपवाद आहे. ती अर्पणपत्रिका आहे –

‘ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठाचं गवत खाणाऱ्या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो’.

मला वाटतं, इथं कवी म्हणतोय की, कागदाचा जरी लगदा झाला तरीसुद्धा कविता राहते. याबद्दल अधिक काही मी म्हणत नाही. अर्थ काढावा तसा तितका निघू शकतो. आत्ता मला हा सुचला एवढंच. आपण पान उलटत जातो. एका पानावर कवितेची नावं आपल्याला दिसायला लागतात आणि सहज वर नजर गेली तर लक्षात येतं- सुरुवातीला लिहिलेलं आहे- ‘सर’. खाली तर कवितांची नावं आहेत, मग वर ‘सर’ कशाला? ‘सर’ तर पावसाची असते, मग ही ‘सर’ कोणती? कविता वाचताना लक्षात यायला लागतं, ही पहिली सर डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंची आहे. भाषेचा वापर शहाणे किती कल्पकतेनं करतात, त्याचं हे एक उदाहरण. या सराचं नाव आहे ‘अश्रू’. त्यातली पहिली कविता आहे- ‘टीपं’. या कवितेपासून सुरू झालेलं पुस्तक ‘शेवटचा अश्रू’ या कवितेबरोबर संपतं.

आता किमबद्दल. या पुस्तकांत ‘महामार्गावरील नग्निका’ नावाची मोठी कविता आहे. त्यातला दुसरा भाग आहे- ‘क्षमा सक्त’… मोठं आहे.
कविता संपते तेव्हा किमनं कवीलाही क्षमा केलेली आहे, पण कवीच्या मनातून अजून किम हललेली नाही. आपण पुढची कविता वाचतो. आणि ही किम तुमच्या मनातूनही हलत नाही. अशाच अनेक कविता या पुस्तकामध्ये आहेत.

त्यातली ‘कॅमेरा’ नावाची कविता म्हटलं तर आत्मचरित्रपर आहे. अर्पणपत्रिकेत “माझ्या कवितांचा लगदा होवो, या नदीकाठाचं गवत खाणाऱ्या म्हशींच्या दुधात माझ्या कवितांचा अंश सापडो” असं म्हणणारा कवी आता ‘शेवटचा अश्रू’मध्ये सरळ विश्वात्मक देवीला साकडं घालतो. आपल्याला ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’ची आठवण येते. इथं पुस्तक संपतं आणि आपल्या मनात सुरू होतं. आता या पुस्तकाची ही चौथी आवृत्ती तुमच्या हातात सोपवलेली आहे. जरूर वाचा. आणि कवीच्या शब्दांत म्हणायचं तर ‘ही वही कोरडी नकोस ठेवू…’ ते का? तर कविता वाचतांना आपल्याला आपसूक कळून जातं..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!