
काळजीवाहूंचा सहभाग आणि वर्गातील सुधारणा यांचे महत्त्व एप्रिलमध्ये का वाढते आहे?
‘ऑटिझम’विषयीची जागरूकता आणि त्याचा स्वीकार या संदर्भातील महिना अशी एप्रिल महिन्याची ओळख आहे. या महिन्यात ‘ऑटिझम’बद्दलची सर्वसमावेशक धोरणे, त्वरीत उपचार आणि रुग्णांची काळजी घेणाऱ्या काळजीवाहूंच्या गरजांची दखल यांकडे विशेष लक्ष वेधले जाते. हा जागतिक उपक्रम १९७०मध्ये ‘ऑटिझम सोसायटी ऑफ अमेरिका’ या संस्थेने सुरू केला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाने तो २ एप्रिल रोजी अधोरेखित होतो. यावर्षीचा विषय ‘वेगळेपणाचा सन्मान करा’ हा असून, न्यूरोडायव्हर्सिटी (मस्तिष्काचे वेगळेपण) स्वीकारणे आणि घरे, शाळा, कार्यस्थळे व समाजामध्ये त्याविषयी समावेशक वातावरण निर्माण करणे यावर भर दिला जात आहे.
या संदर्भात मुग्धा कालरा यांचे ‘आय सी यू, आय गेट यू : द सेल्फ केअर गाईड फॉर स्पेशल नीड्स पेरेंट्स’ हे क्रांतिकारी पुस्तक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन म्हणून पुढे आले आहे. भारतीय समावेशन परिषद आणि भारतीय न्यूरोडायव्हर्सिटी परिषद (बंगळुरू) या परिषदांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाने कुटुंबे, शिक्षक आणि नियोक्त्यांसाठी योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.
चळवळ निर्माण करणारे पुस्तक
मुग्धा कालरा यांचे हे पुस्तक न्यूरोडायव्हर्जंट (मस्तिष्कात वेगळेपण असलेल्या) मुलांच्या पालकांना भेडसावणाऱ्या भावनिक, आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर थेट भाष्य करते. भारतात अशा मुलांना समाजातून फारसा आधार मिळत नाही. त्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. मुग्धा कालरा या एक पुरस्कारप्राप्त पत्रकार आहेत. २०२१मध्ये त्यांना ‘बीबीसी १०० वुमेन’ हा सन्मान मिळाला होता. ‘नॉट दॅट दिफरन्ट’ या चळवळीच्या त्या सह-संस्थापिका आहेत. आपल्या काळजीवाहू (केअरगिव्हर) म्हणूनच्या वैयक्तिक अनुभवातून आणि समावेशनाच्या व्यावसायिक कौशल्यातून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
हे पुस्तक पालकांना स्वतःची काळजी घेण्यास मदत करणाऱ्या उपयोगी टिप्स आणि विचारपूर्ण कल्पना प्रदान करते. केवळ स्वतःसाठी म्हणून नव्हे, तर आपल्या न्यूरोडायव्हर्जंट मुलांना अधिक चांगल्या प्रकारे साथ देता यावी म्हणून पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनीही अशा पालकांसाठी काही सहायक धोरणे तयार करावीत, कारण या पालकांना सक्षम केल्यास संपूर्ण दिव्यांग समुदायाची परिस्थिती सुधारू शकते, असा संदेश हे पुस्तक देते.
“जेव्हा कंपन्या काळजीवाहूंना नोकरी देतात, तेव्हा त्या संपूर्ण कुटुंबांना अधिक स्थिर आणि समाधानकारक जीवन जगण्याची संधी देतात. अशा प्रकारच्या मदतीमुळे अपंगत्व असलेल्या समाजात आत्मविश्वास आणि स्वायत्ततेचा प्रसार होतो,” असे मुग्धा कालरा स्पष्ट करतात.
लेखिकेविषयी
मुग्धा कालरा यांच्या मुलास ऑटिझम असल्याचे निदान २०१४मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी या आजाराविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘नॉट दॅट डिफरंट’ या भारतातील पहिल्या व मुलांनी चालवलेल्या न्यूरोडायव्हर्सिटी चळवळीची आणि संसाधन गटाची स्थापना केली. ऑटिझमविषयीची जागरूकता, त्याचा स्वीकार आणि त्यावर उपचार यांबाबत प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश आहे. कालरा या एक पुरस्कारप्राप्त पटकथालेखक आहेत, तसेच समावेशन आणि अदृश्य अपंगत्वांवर प्रशिक्षण देणाऱ्या कॉर्पोरेट प्रशिक्षिकादेखील आहेत.
‘ऑटिझम’विषयीच्या जागरुकतेचे एप्रिलमध्ये महत्त्व का?
भारतात ‘ऑटिझम’चे प्रमाण वाढत असताना, त्याविषयीची लक्षणे लवकर ओळखणे आणि योग्य वेळी उपचार करणे याबाबतची जागरूकता अधिक गरजेची झाली आहे. अजूनही अनेक कुटुंबे ऑटिझमला कलंक मानतात किंवा विशिष्ट सुविधांचा अभाव असल्याने या आजाराचे निदान उशिरा होते.
या दृष्टीने एप्रिल महिन्यात माध्यमांना खालील मुद्दे अधोरेखित करण्याची संधी आहे :
- ऑटिझम म्हणजे काय आणि त्याचे प्रमाण का वाढत आहे?
- ऑटिझम प्रारंभिक लक्षणे; त्यावर वेळीच हस्तक्षेप का गरजेचा?
- ऑटिझम असलेल्या मुलांच्या कुटुंबांचे वास्तव आणि त्यांची प्रवासकथा
- काळजीवाहूंचा (केअरगिव्हर) सहभाग : कुटुंबांना मदत करणाऱ्या कार्यस्थळी धोरणांची गरज
- विशेष गरजा असलेल्या कुटुंबांसाठी आर्थिक नियोजन : सरकारी मदतीशिवायचे जीवनाचे व्यवस्थापन
- भारतामध्ये सहाय्यक निवास (असिस्टेड लिव्हिंग) : न्यूरोडायव्हर्जंट प्रौढांसाठी दीर्घकालीन उपचारांच्या मॉडेल्सची तातडीची गरज
- समावेशक शिक्षण : धोरण आणि वर्गातील प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील दरी भरून काढणे.
‘ध्वनी’ : समावेशक वर्गांसाठी एक क्रांतिकारी शिक्षकी साधन
‘ध्वनी – वर्गात समावेश घडवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांचे विचार’ हे ‘नॉट दॅट डिफरंट’चे प्रत्येक शिक्षकासाठीचे उपयुक्त साधन आहे. ‘नॉट दॅट डिफरंट’ हा ‘बुकोस्मिया’चा ‘न्यूरोडायव्हर्सिटी’साठीचा प्रचारकी उपक्रम आहे.
‘बुकोस्मिया’ या शब्दाचा अर्थ होतो ‘पुस्तकाचा सुगंध’. ‘मुलांसाठी, मुलांकडून’ या स्वरुपाची ही भारतातील पहिल्या क्रमांकाची प्रकाशन संस्था आहे. जगभरातील १४५ हून अधिक ठिकाणच्या हजारो लहान मुलांचे साहित्य दरवर्षी प्रकाशित करून, भारतातील मुलांनी चालवलेला पहिला लाईव्ह पॉडकास्ट सादर करून आणि न्यूरोडायव्हर्सिटी स्वीकारण्याची व मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची पायाभूत चळवळ उभारून ‘बुकोस्मिया’ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विविध गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण पद्धतीत बदल घडवणाऱ्या दशकभराच्या अनुभव असलेल्या शिक्षकांच्या प्रयत्नांचे ‘ध्वनी’ हे फलित आहे. हे पुस्तक शिक्षकांना दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी रणनीती देते, शिक्षकांचे स्वतःचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देते, तसेच त्यांना आत्मविश्वास देते की ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगळ्या गरजा पूर्ण करू शकतात.
विशेष शिक्षक व समावेशनाच्या प्रसारक श्वेता श्रीवत्सन यांनी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांशी चर्चा करून हे मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे. यात भारतीय मॉंटेसरी केंद्राच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) फोकस ग्रुपच्या सदस्य डॉ. सुमती रवींद्रनाथ यांचाही सहभाग आहे. तसेच अझीम प्रेमजी विद्यापीठातील मानसिक आरोग्य विभागाच्या भार्गवी रामन यांनी शिक्षकांना आत्मविश्वास आणि सहानुभूतीने सक्षम करण्याविषयी या पुस्तकात मौलिक योगदान दिले आहे.
याशिवाय, या पुस्तकात समावेशन आणि शिक्षण क्षेत्रातील इतरही अग्रणी व्यक्तींचा सहभाग आहे. ‘संहिता अकादमी’च्या संस्थापिका प्राचार्या चंपा साहा (यांच्या संस्थेत किमान २० टक्के वंचित मुलांना प्रवेश दिला जातो. संस्थापक : इन्फोसिसचे शिबूलाल); ‘इंटरनॅशनल स्कूल ग्रीनवूड हाय’ येथे पर्यायी शिक्षण उपाय विभागाच्या प्रमुख पूजा सूद; ‘सोल्स आर्क’ संस्थेच्या संस्थापिका सोनाली सैनी (यांची संस्था तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्य सरकारांसोबत अपंगत्व समावेशनावर काम करते.) यांचा यात समावेश आहे. हे पुस्तक ‘इको स्टेप फाउंडेशन’ यांच्या पाठिंब्याने प्रकाशित करण्यात आले आहे.
चर्चा अधिक व्यापक आणि सखोल करण्यास हे पुस्तक मदत करते. समावेशक पद्धती या केवळ विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीत, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लाभदायक ठरतात. तसेच, या पद्धती शिक्षकांसाठीही उपयोगी ठरतात. त्या केवळ आरपीडब्ल्यूडी कायद्याचे पालन करण्यासाठीच आवश्यक नाहीत, तर शिक्षण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठीही महत्त्वाच्या आहेत, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
‘एक स्टेप फाउंडेशन’च्या धोरण व भागीदारी विभागाच्या प्रमुख दीपिका मोगिलीशेट्टी म्हणाल्या, “हे पुस्तक वाचताना, त्याकडे केवळ माहिती म्हणून पाहू नका, तर प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतांपेक्षा जास्त ओळख मिळावी, त्याचे म्हणणे ऐकले जावे आणि त्याला आनंद मिळावा यासाठीचे आमंत्रण म्हणून पाहा… हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही एखाद्या विशिष्ट लेबलच्या पुढे पाहण्यास, संघर्षांच्या पलिकडे जाण्यास आणि वेगळी दुनिया अनुभवणाऱ्या मुलांच्या मनांमध्ये डोकावण्यास प्रवृत्त करेल.”