
पणजी :
आजचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा भाऊसाहेब बांदोडकरांच्या स्वप्नातला पक्ष नक्कीच नाही. कारण या पक्षात इतर राजकीय पक्षांसारखी लोकशाही नाही. तसे असते, तर आज या पक्षाला एवढी गळती लागली नसती. आज या पक्षात एकही आमदार का टिकत नाही? याचा विचार झाला पाहिजे, असे ठामपणे नमूद करत भाजपाला राज्यात मगोपसोबत युती करण्याची गरज केव्हाच नव्हती आणि आजही नाही, असा घणाघात प्रियोळ मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केला. पणजी येथे माध्यमांनी विचारले असता त्यांनी याबद्दल आपले मत व्यक्त केले.
मगोप दावा करत असलेल्या प्रत्त्येक जागेवर, म्हणजे शिरोडा, फोंडा आणि प्रियोळ मतदारसंघात आम्ही त्यांचा थेट पराभव केलेला आहे. आणि तो सातत्याने केलेला आहे. मग अशावेळी त्यांच्यासोबत युती करण्याच्या प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल तसे अत्यंत जबाबदारीने विधान केले आहे, आम्ही पक्ष कार्यकर्ते म्हणून त्यांच्या या विधानासोबत सदैव असू. आणि एवढेच नाही तर प्रदेश भाजप आणि केंद्रीय भाजपला देखील या सगळ्याची जाणीव आहे. संघटना म्हणून आम्ही नेहमीच राज्यात दमदार आहोत. त्यामुळेच आगामी काय कोणत्याच निवडणुकीत मगोची आम्हाला गरज नसल्याचे, गोविंद गावडे यांनी निक्षून सांगितले.
‘हा बहुजनांचा पक्ष कसा?’
जर हे दोघे बंधू मगोप हा बहुजनांचा पक्ष असल्याचे सतत सांगत असतात, तर मग पक्षाचे अध्यक्षपद सतत यांच्याकडेच का असते? का त्यांना पक्षातील इतर कार्यकर्ते, नेते दिसत नाहीत? जीत आरोलकर सारखा सक्षम पर्याय या पक्षाकडेअसून देखील हे बंधू आरोलकर कडे का अध्यक्षपद का देत नाहित? हे यांना शक्य नाही, मग हा पक्ष बहुजनांचा कसा? असा रोखठोक प्रश्न यावेळी गोविंद गावडे यांनी विचारला.