एआयवरील प्रचंड खर्च गुगलला महागात; अल्फाबेटच्या शेअरमध्ये ऐतिहासिक घसरण
सर्च जाहिरातींच्या उत्पन्नातील मंदी आणि वाढता एआय खर्च यामुळे गुंतवणूकदार चिंतेत
न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा मोठा आर्थिक फटका गुगलची (google) मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटला बसला आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकालांनंतर गुरुवारी अल्फाबेटच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कंपनीच्या शेअरची ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वांत मोठी घसरण ठरली. या घसरणीमुळे कंपनीच्या बाजारमूल्यातून सुमारे ५०० अब्ज डॉलर कमी झाले.
अल्फाबेटने बुधवारी जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये महसुलाच्या बाबतीत विश्लेषकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक तुलनेत २४.७ टक्क्यांनी वाढून १२७.५८ अब्ज डॉलरवर पोहोचला. मात्र, बाजारातील विश्लेषकांनी १२८.२ अब्ज डॉलर महसुलाचा अंदाज व्यक्त केला होता. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ३४.९८ अब्ज डॉलरवरून घसरून २६.१७ अब्ज डॉलर झाला. म्हणजेच नफ्यात सुमारे २५ टक्क्यांची घट झाली.
गुगलच्या पारंपरिक सर्च इंजिनमधून मिळणाऱ्या जाहिरात महसुलातील अपेक्षेपेक्षा कमी वाढ ही गुंतवणूकदारांच्या चिंतेचे प्रमुख कारण ठरली आहे. ग्राहक पारंपरिक सर्चऐवजी चॅटजीपीटीसारख्या एआय चॅटबॉटचा वापर वाढवत असल्याने गुगलच्या जाहिरात व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एआय आधारित सर्चमधील लांब आणि संवादात्मक प्रश्नांना सध्या पारंपरिक सर्चच्या तुलनेत जाहिरातींमधून कमी महसूल मिळत आहे.
दुसरीकडे, एआय क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अल्फाबेटकडून डेटा सेंटर, सर्व्हर आणि संगणकीय पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत भांडवली खर्चापोटी ५१.४ अब्ज डॉलर खर्च केले. परिणामी, कंपनीचा मुक्त रोख प्रवाह (फ्री कॅश फ्लो) उणे ९.१ अब्ज डॉलर झाला. कंपनीसाठी सलग दुसऱ्या तिमाहीत मुक्त रोख प्रवाह नकारात्मक राहिला आहे. २०२६ मध्ये कंपनीचा एकूण भांडवली खर्च १९५ ते २०५ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०२७ मध्ये हा खर्च आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे कंपनीने संकेत दिले आहेत.
मात्र, गुगलच्या क्लाउड व्यवसायाने चांगली कामगिरी केली आहे. गुगल क्लाउडचा महसूल वार्षिक तुलनेत १०३ टक्क्यांनी वाढून ३०.७१ अब्ज डॉलर झाला. एआय सेवांसाठी वाढत असलेली मागणी या व्यवसायाच्या वाढीला कारणीभूत ठरली आहे.
एआय क्षेत्रातील गुंतवणुकीतून प्रत्यक्ष उत्पन्न किती आणि किती कालावधीत मिळणार, हा प्रश्न आता गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अल्फाबेटचा रोख प्रवाह आणि सर्च जाहिरातींची कामगिरी कमकुवत ठरत असल्याने बाजाराने कंपनीच्या वाढत्या खर्चाबाबत सावध भूमिका घेतली आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे भविष्यात मोठ्या व्यावसायिक संधी निर्माण होण्याची शक्यता असली, तरी त्यासाठी सध्या केला जाणारा प्रचंड खर्च कितपत फायदेशीर ठरेल, याचे उत्तर कंपन्यांना आपल्या आर्थिक निकालांतून द्यावे लागणार आहे. अल्फाबेटच्या शेअरमधील घसरण ही संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एआय गुंतवणुकीवरील परताव्याबाबत वाढत असलेल्या बाजारातील सावधगिरीची महत्त्वाची खूण मानली जात आहे.




